Parbhani Bike fire: परभणी शहरात कृष्णाई ग्रीन पार्क परिसरात एका तरुणाची दुचाकी पेटवून त्याला आग लावण्यात आली. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे.
शहरातील अनुसया टॉकीजजवळील घटना कोतवाली पोलिसात एकाविरुध्द गुन्हा नोंद....!
परभणी (Parbhani Bike fire) : शहरातील अनुसया टॉकीजच्या बाजूला असलेल्या कृष्णाई ग्रीन पार्क परिसरात एका तरुणाची दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अजय संजय गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवार ७ मे रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास नर्सिंग हॉस्टेललगतच्या मैदानात त्यांची एमएच २२ बीएच ७३५८ या क्रमांकाची दुचाकी उभी होती. यावेळी आरोपी कुंडलिक उत्तम काळे याने दुसर्या व्यक्तीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून फिर्यादीची दुचाकी खाली पाडली. त्यानंतर पेट्रोल टाकीवर दगड मारून ती फोडली व माचीसच्या काडीने आग लावून दुचाकी पेटविली. या (Parbhani Bike fire) घटनेत सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अजय गायकवाड यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवार ८ मे रोजी कुंडलिक काळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. माने करीत आहेत.
रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू
परभणी : शहरातील भीमनगर परिसरातील उड्डाणपुलाखाली रेल्वे पटरीवर रेल्वेच्या धडकेत एका ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अंबादास गोविंद गायकवाड (रा. भीमनगर, परभणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास गायकवाड हे शनिवारी पहाटे रेल्वे पटरी परिसरात गेले असता त्यांना रेल्वेची धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला व चेहर्यावर गंभीर दुखापत झाली असून डावा पायही तुटल्याचे आढळून आले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचे भाऊ किरण गायकवाड यांच्या खबरीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.