Parbhani Assault Crime: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे जुन्या भांडणाच्या कारणातून गोविंद भांगे यांना गंभीरपणे मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Assault Crime) : गंगाखेड येथे जुन्या भांडणाच्या कारणातून एकास लोखंडी रॉड व हातोडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार १३ एप्रिल रोजी रात्री गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात घडली. याप्रकरणी रविवार १९ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पालम तालुक्यातील सावंगी भुजबळ येथील रहिवासी गोविंद दशरथ भांगे ह. मु. योगेश्वर कॉलनी गंगाखेड यांना सावंगी भुजबळ येथील विकास देविदास भुजबळ यांनी सोमवार दि. १३ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास फोन करून जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत तू खूप माजलास, तुझे खूप धंदे चालू आहे, तुला बघून घेतो असे म्हणत तू कोठे आहेस मला भेटायला ये असे म्हटल्याने गोविंद भांगे हे परळी नाका परिसरात त्यास भेटण्यासाठी गेले असता परळी नाक्यावरील एका हॉटेलसमोर अनिल केरबा सातपुते, विकास देविदास भुजबळ, दिपक सखाराम घोगरे व प्रकाश खटिंग हे चौघे दिसल्याने त्यांच्याजवळ जाऊन मला शिवीगाळ का करतो असे गोविंद भांगे यांनी विकास भुजबळ यांना विचारताच दिपक घोगरे यांनी थापड बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रकाश खटिंग व अनिल सातपुते यांनी लोखंडी रॉडने गोविंद भांगे यांच्या दोन्ही पायाच्या गुडघ्याखाली नळीवर, डाव्या बाजूच्या पाठीवर, खुब्यावर मारून मुक्कामार दिला.
विकास भुजबळ याने हातोडीने डोक्याचे पाठीमागून डाव्या बाजूस मारून मारून जखमी केले. (Parbhani Assault Crime) डोक्यातून रक्त निघून चक्कर येऊन खाली पडल्यानंतर प्रकाश खटिंग व अनिल सातपुते यांनी लोखंडी रॉडने पुन्हा दोन्ही पायावर मारून मुक्का मार दिला. या दरम्यान फिर्यादीचा भाऊ अशोकराव दशरथ भांगे, सचिन शिवाजी नरवाडे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्या ही पाठीवर लोखंडी रॉडने मारून मुक्का मार दिला व विकास भुजबळ याने चाकू काढून तुम्ही जर याला सोडविण्यासाठी आलात तर तुम्हाला दोघांना कापून टाकीन अशी धमकी दिल्याने ते दोघे ही घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर वाहन चालक सुभाष मुंडे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता तू जर यास सोडविण्यासाठी आलास तर तुला खतम करून टाकीन अशी धमकी दिल्याची व अचानक पोलीस आल्याचे पाहून ते चौघे ही पळून गेल्याची फिर्याद गोविंद दशरथ भांगे वय ४२ वर्ष रा. सावंगी भुजबळ ता. पालम यांनी दिल्यावरून रविवार १९ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि राम गिते हे करीत आहेत.