दोन कर्मचार्यांना मारहाण करून रोकड केली लंपास
झरी येथील घटना चोरटे पसार
परभणी (Parbhani robbery case) : तालुक्यातील झरी येथील जिंतूर-परभणी रोडवरील झरी येथील पप्पूज पेट्रोल पंपावर शुक्रवार १५ मे रोजी दुपाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकत दोन कर्मचार्यांना बेदम मारहाण करून पंपावरील दोन दिवसांची रोकड जवळपास ३ लाख ३० हजार रुपये लंपास केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात आरोपी चोरीच्या उद्देशाने पेट्रोल पंप परिसरात सुमारे अर्धा तास आधीपासून फिरत होते. त्यांनी पंपाची रेकी करून तेथे केवळ दोन कर्मचारी असल्याची खात्री केल्यानंतर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी पंपावरील कर्मचारी विक्रम बालाजी गवळी व अमोल मुधवर (दोघेही रा. झरी) यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर पंपावरील दोन दिवसांची रोकड घेऊन आरोपी पसार झाले.
घटनेदरम्यान परिसरातील नागरिक व परिसरातील (Parbhani robbery case) एका हॉटेल मधील कर्मचारी मदतीसाठी धावले असता आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांना रोखत चोरटे पसार झाले. जखमी कर्मचार्यांना तातडीने अॅम्बुलन्सच्या सहाय्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार तसेच स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
झरी परिसरात भीतीचे वातावरण
झरी येथील जिंतूर-परभणी रोडवरील एका पेट्रोल पंपावर भरदिवसा झालेल्या दरोड्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल पंप कर्मचार्यांना मारहाण करून रोकड लंपास केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. आरोपींनी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनाही चाकूचा धाक दाखविल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.