Parbhani Dagger Terror: परभणीच्या बोरी पोलिस स्टेशनमध्ये चार आरोपींना खंजीर घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बोरीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खंजिरासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
परभणी/बोरी (Parbhani Dagger Terror) : जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परभणी रोडवरील शेक गावाच्या परिसरात रविवार दि.३ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चार आरोपी एकत्रित येऊन हातात लोखंडी खंजीर घेऊन फिरत असल्याची माहिती बोरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेऊन जेरबंद केले. या आरोपींवर बोरीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून खंजिरासह वाहन जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी धडक कार्यवाही केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पोलिसांनी या (Parbhani Dagger Terror) प्रकरणी अर्जुन केशवराव खिल्लारे (रा. शेक, ता. जिंतूर), सिद्धार्थ सुरेश पंडीत (रा. मांडवा, ता. परभणी), राहुल कैलास वाव्हळे व श्रीकांत अशोक कठाळे (दोघे रा. टाकळी कुंभकर्ण, ता. परभणी) या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.प्राथमिक तपासात हे सर्वजण एकत्र येऊन गावामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे समोर आले आहे.कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी खंजीर तसेच बजाज कंपनीचा ऑटो (एम एच २२ ए पी ४०८९) जप्त केला असून या मुद्देमालाची एकूण किंमत १,५०,५०० रुपये आहे.
या (Parbhani Dagger Terror) प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 133/2026 अन्वये भा.ह.का. कलम 4, 25 तसेच भा.न्या.सं. कलम 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेबाबत पोलीस कर्मचारी प्रकाश लिंबाजी मोरे यांनी फिर्याद दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड हे तपास करीत आहेत. ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक एस.एम. थोरवे, पोलीस कर्मचारी रामप्रसाद कोकाटे व ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या
हातात खंजीर घेऊन हे चार आरोपी एका रिक्षात बसलेले होते. प्रसंगावधान साधून पोलिसांनी या चौघांना पळून जाण्याचीही संधी दिली नाही. ज्या वाहनात हे आरोपी बसलेले होते त्याच ठिकाणी त्यांना एकदम छापा टाकून पकडण्यात आले. यात मुख्य आरोपीस न्यायालयीन कोठडी तर तिघांना जामीन मिळाल्याची माहिती कळली.