Sonpeth Police Action: सोनपेठ येथील मारहाणीचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणण्यात आले. बदला घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा, सोनपेठ पोलिसांनी धामोनी येथे कारवाई
परभणी स्थागुशा, सोनपेठ पोलिसांची धामोनी येथे कारवाई
परभणी (Sonpeth Police Action) : सोनपेठ येथील मारहाणीचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणण्यात आले. बदला घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा, सोनपेठ पोलिसांनी धामोनी येथे कारवाई करत गावठी कट्टा, सहा जिवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी एकूण ३ जणांवर सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २६ जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास करण्यात आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, धामोनी येथील विठ्ठल गुंजाळ व गणेश मुळे या दोघांमध्ये गावातील ग्रामपंचायतीच्या कारणावरुन वाद झाला होता. याच वादात मार्च महिन्यात गणेश मुळे व त्याच्या साथीदारांनी विठ्ठल याला मारहाण केली होती. त्याच्या फिर्यादीवरुन दैठणा पोलिसात गुन्हा नोंद होता. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी विठ्ठल कोंडिबा गुंजाळ, त्याचा नातेवाईक आशिष सावंत या दोघांनी उत्तर प्रदेश येथून गावठी पिस्तूल आणली. संबंधित दोघे गणेश मुळे याला २७ जून रोजी मारणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरुन स्थागुशाचे सपोनि. अशोक जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार महेश कौठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, सचिन भदर्गे, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, महारुद्र सपकाळ, सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोनि. गिते, पोउपनि. किरकन, सपोउपनि. कुलकर्णी यांच्या पथकाने कारवाई करत विठ्ठल गुंजाळ, आशिष सावंत यांना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी उत्तर प्रदेश येथे जावून करणकुमार नामक व्यक्तीकडून सदर हत्यार खरेदी केल्याचे सांगितले. शेतातील पत्राच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.