Liquor license: परभणीच्या एरंडेश्वर येथे जयकिसान बार अॅन्ड रेस्टॉरंटला बनावट कागदपत्रे सादर करून दारुविक्रीचा परवाना मंजूर केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.
राज्य उत्पादन शुल्कचा भोंगळ कारभार; ग्रामस्थांकडून परवाना रद्द करण्याची मागणी
परभणी (Liquor license) : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे जयकिसान बार अॅन्ड रेस्टॉरंटला एफएल-३ दारुविक्री परवाना मंजूर करताना बनावट कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सातबारा उतार्यावर खाडाखोड करून तसेच चुकीची माहिती देऊन परवाना मिळविण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि मंजूर केलेला परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
एरंडेश्वर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जयकिसान बार अॅन्ड रेस्टॉरंटचे मालक मदन काळे यांनी एफएल - ३ अनुज्ञप्ती मंजूर करण्यासाठी मालमत्ता क्र. १२५५ गट नंबर ९६ / १ क्षेत्रफळ ०५ हे त्यांच्या नावे असल्याचे दाखविले आहे. मात्र ज्या ठिकाणी बार सुरू करण्यात आला आहे त्या जागेच्या मालकी हक्काबाबत शंका आहे. सातबारा उतार्यात फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. कार्यालयात सादर केलेल्या सातबारा उतार्यावरील शाम ठमके यांचे नाव कमी करुन बनावट तयार केलेली सातबारा प्रत सादर केली आहे.
विशेष म्हणजे तत्कालिक पोलिस अधिक्षक, पूर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सुध्दा सदर पनवाना देण्यात येऊ नये असे २५ जानेवारी २०२४ च्या अहवालात स्पष्ट नमुद केले होते. मात्र सर्व नियमांना फाटा देत मद्यविक्रीचा परवाना (Liquor license) देण्यात आला आहे. याशिवाय, स्थानिकांच्या संमतीशिवाय आणि आवश्यक नियमांचे पालन न करता परवाना मंजूर केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या (Liquor license) प्रकरणामुळे गावात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलावर्गासह नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
महसूल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कागदपत्रांची पडताळणी करून सत्य समोर आणावे, बनावट कागदपत्रा आधारे मंजूर करण्यात आलेला (Liquor license) मद्यविक्री परवाना रद्द करावा, संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा दिला आहे.