Mangrulpir Police Action: मंगरूळपीर पोलिसांनी शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करून सराईत चोरट्याला अटक केली.
दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त; शहरातील वाढत्या चोरींना आळा
मंगरूळपीर (Mangrulpir Police Action) : शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत मंगरूळपीर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १ एप्रिल व ३ एप्रिल २०२६ रोजी विनोद तुळशीराम जाधव व अश्विन शिवचंद चव्हाण (दोन्ही रा. मंगरूळपीर) यांनी त्यांच्या मोटारसायकली चोरीस गेल्याची तक्रार मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. जाधव यांची हिरो होंडा फॅशन प्रो (क्र. एमएच ३० एआर १७८७, किंमत सुमारे ३० हजार रुपये) ही जांब रोड परिसरातून, तर चव्हाण यांची हिरो होंडा फॅशन प्रो (क्र. एमएच ३७ क्यू ६३७४, किंमत सुमारे ३० हजार रुपये) ही बसस्थानक परिसरातून चोरीस गेली होती.
या (Mangrulpir Police Action) प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करून डी.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. पोलिसांनी संशयित शुभम पुंडलिक मनवर (वय १९ वर्षे, रा. निंबी ) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या.
ही (Mangrulpir Police Action) कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर व पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत सपोनि गणेश काळे,संजय घाटोळे, प्रमोद वानखडे, रफिक मांजरे, प्रविण माळकर, गजानन ब्राह्मण, मनीष आडे व चालक आशिष रघुवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.