Tobacco Sales Ban: महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू विक्रीवर जुलै २०१२ पासून बंदी लागू. मात्र बंदी लागू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेली, तरीही ही अंमलबजावणी केवळ कागदोपत्री
मानोरा (Tobacco Sales Ban) : महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू विक्रीवर जुलै २०१२ पासून बंदी लागू आहे. राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तोंडाचा कर्करोग, हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांशी गुटख्याचा संबंध असल्याने उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर निर्बंध घातले होते. मात्र बंदी लागू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेली, तरीही ही अंमलबजावणी केवळ कागदोपत्री राहिली आहे.
सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाईचा धडाका लावल्याने भीतीपोटी तालुक्यातील शेकडो पानठेले बंद (Tobacco Sales Ban) ठेवण्यात आले आहेत. त्यातच चढ्या दराने काही ठिकाणी गुटखा विक्री सुरूच आहे. यामुळे पानठेले विक्रेत्यांकडे माल येतोय कुठून? असा सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दिवसांपासून तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई सुरू आहे. या भीतीमुळे पानटपऱ्या बंद आहेत. रोजच्या उत्पन्नावर संसार चालविणाऱ्या व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सध्या कारवाईच्या अफवांनी शहरात विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. सरकारने गुटखा पूर्णपणे बंद करायचा असेल, तर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोकावे. कारखाने बंद झाले तर माल बाजारात येणारच नाही. पण सध्या कारवाईचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांना बसत आहे, अशी खंत शहरातील पानटपरी चालकांनी व्यक्त केली आहे.
राज्यात गुटखा बंदी लागू (Tobacco Sales Ban) झाल्यानंतर न्यायालयांनीही या बंदीला वैध ठरविले होते. बंदीचे प्रमुख कारण म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांमुळे वाढणारे कर्करोग आणि इतर आरोग्यविषयक धोके. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांऐवजी मोठ्या व्यावसायिकांवर व गुटखा उत्पादक कंपन्यांनाच टाळे लावा, अशी मागणी होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात कारवाई मोहीम हाती घेतली आहे. गुटखा बंदीच्या काळात काळाबाजार वाढला. उत्पादन करणाऱ्या कंपन्या, घाऊक पुरवठादार आणि राज्याबाहेरून माल आज सात ते दहा रुपयांना विकला जात आहे. बंदीमुळे अवैध साखळी अधिक मजबूत बनण्याच्या मोठ्या नेटवर्कवर धाडी टाकल्या पाहिजेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
२० रुपयाचा मिळणारा घोटा चढ्या भावाने ३० रुपयात मिळत असल्याची चर्चा असुन घोटाची होम डिलिव्हरी सुध्दा सुरू असल्याचे ऐकावयास येत आहे.