Latur Police Action: शेतकर्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून कत्तल करणार्या आंतरराज्यीय टोळीचा लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला, कारवाईत लातूर जिल्ह्या..
हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा भुरटे चोर पकडण्यातच मग्न
हिंगोली (Latur Police Action) : शेतकर्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून कत्तल करणार्या आंतरराज्यीय टोळीचा लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लातूर जिल्ह्यातील २४ आणि बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ असे एकूण ४१ जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. परभणी जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ लाख ६८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात (Latur Police Action) सातत्याने जनावरे चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनेक दिवस तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. ६ ऑगस्ट रोजी किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाठवाडी फाटा येथे ही टोळी व्यवहारासाठी जमली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पिकअपमधून पळण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून अतिक सुलतान कुरेशी रा. गंगाखेड, मुजाहिद बाबू खाटीक रा. परभणी आणि साजू गफार कुरेशी रा. पालम या तिघांना ताब्यात घेण्यात आले. हरियाणातील नियाज उर्फ महंमद नवाब, आस मोहम्मद सिरदार यांच्यासह इतर चार जण मात्र पळून गेले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, जळकोट, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, चाकूर, किनगाव, अहमदपूर, औसा, कारार शिरसी आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून त्यांनी बैल, गायी, म्हशी आणि वासरे चोरल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची कत्तल करून मांस विक्रीतून मोठी कमाई केल्याचेही त्यांनी मान्य केले. या चौकशीतून बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील आणखी १७ गुन्हेही उघड झाले आहेत.
आरोपींकडून जप्त केलेली २४ लाख ६८ हजार रुपयांची रोकड ही जनावरे विक्रीतून मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या एका कारवाईमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जनावरे चोरीने हैराण झालेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याच कारवाईतून हिंगोली जिल्हा पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता देखील ऐरणीवर आली आहे. कारण लातूर पोलिसांनी तपास करून हिंगोली जिल्ह्यातील १७ गुन्हे उघड केले. म्हणजेच ही आंतरराज्यीय टोळी हिंगोलीच्या हद्दीतही सक्रिय होती. तरीही हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत कोणतीच ठोस माहिती मिळाली नाही किंवा कोणतीही मोठी कारवाई करता आली नाही.
हिंगोली जिल्ह्याला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक लाभले असताना स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात कमकुमवत ठरत आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षकांनी अशा बाबींकडे गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे.
जनावर चोरीच्या घटनेने शेतकरी होते हैराण
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत या पाचही तालुक्यामध्ये मागील काही महिन्यापासून जनावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी शेतातील आखाड्यासह इतर ठिकाणाहून लाखो रूपयांचे जनावरे चोरून पलायन केले. विशेष म्हणजे अंतर जिल्ह्यातील टोळी हिंगोली जिल्ह्यामध्ये सक्रीय झाली असताना त्याचा स्थानिक गुन्हे शाखेला थांगपत्ता लागला नाही ही तर नवलाईचीच बाब आहे. या प्रकरणात अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. जनावर चोरींच्या घटनांमुळे शेतकर्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतातील आखाड्यांवर अक्षरश: जनावर चोरीला जाऊ नये, यासाठी रात्रगस्तीही शेतकर्यांना घालावी लागत होती. लातूर पोलिसांनी जनावर चोरणारी टोळी पकडल्याने शेतकर्यांत समाधानाचे वातावरण आहे.
गुप्त माहितीच्या आधारे तपासात हिंगोलीच्या यंत्रणेचे पिछेहाट
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जनावरे चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे असताना देखील हिंगोली एलसीबी मोठ्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी किरकोळ आणि भुरट्या चोर्यांमध्ये अडकल्याचे चित्र आहे. तांत्रिक तपास, आंतरजिल्हा समन्वय आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करण्याच्या बाबतीत हिंगोलीचे यंत्रणा लातूरच्या तुलनेत खूपच मागे असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. लातूर पोलिसांनी दाखवलेली धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई पाहता हिंगोली पोलिसांनीही आपली कार्यपद्धती बदलून शेतकर्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा अशा आंतरराज्यीय टोळ्या हिंगोलीला हक्काचे ठिकाण समजून मोकळेपणाने कार्यरत राहतील.