Illegal Liquor Action: पोलीस मदत केंद्र घोट अंतर्गत मौजा नेताजीनगर येथे अवैध दारू विक्री व मोहा फुलाचा सडवा साठवणुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
घोट ( Illegal Liquor Action) : पोलीस मदत केंद्र घोट अंतर्गत मौजा नेताजीनगर येथे अवैध दारू विक्री व मोहा फुलाचा सडवा साठवणुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ९४,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून रोजी पोलीस मदत केंद्र घोटच्या पथकाने नेताजीनगर येथे छापेमारी केली. पहिल्या कारवाईत नमिता गोविंद मंडल (वय ६०) यांच्या घराची झडती घेतली असता १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या २३ निपा,अंदाजे ९,२०० रुपयांचा माल अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला.याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत (Illegal Liquor Action) विकास बिरेन बिस्वास (वय ५५) यांच्या अर्धवट बांधकाम केलेल्या घरातून ५० लिटर क्षमतेच्या १३ प्लास्टिक चुंगड्यांमध्ये साठवून ठेवलेला ६५० लिटर मोहा फुलाचा सडवा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कलम ६५(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत शंकरी पशुपती सरकार (वय ६६) यांच्या घरासमोरील सांधवाडीत ठेवलेल्या चार प्लास्टिक ड्रममधून २०० लिटर मोहा फुलाचा सडवा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत सुमारे २० हजार रुपये असून संबंधित महिलेविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई पोलीस मदत केंद्र घोटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.