Hingoli Turmeric Theft Case: हिंगोली जिल्ह्यातील एमआयडीसी वेअर हाऊसमधून चोरीचे ३५३ कट्टे हळद जप्त करण्यात आले. पोलिसांनी ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
११ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली (Hingoli Turmeric Theft Case) : एमआयडीसी लिंबाळा मक्ता येथील स्टार अॅग्रोवेअर हाऊसिंग अँड कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेडच्या वेअरहाऊसमधून ३५३ कट्टे हळद चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केली. या कारवाईत ९ घरफोडी, ५ चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या एका आरोपीसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत ११ लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी मालाविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत होते.
७ जून रोजी एमआयडीसी तील वेअरहाऊस मधून (Hingoli Turmeric Theft Case) अज्ञात चोरट्यांनी ३५३ कट्टे हळद चोरून नेली होती. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान संशयित बावनखोली भागात असल्याची माहिती मिळताच पथकाने सयद साजीद सयद मुजीब रा. मस्तानशाह नगर) व शेख अरबाज अब्दुल रौफ रा. नगर परिषद कॉलनी हिंगोली यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शत्रु पुंजाजी चव्हाण रा. खरबी व सचिन उर्फ बंटी सुरेश चव्हाण रा. पारथीवाडा) यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १० लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, ५ जून रोजी ताब्यात घेतलेल्या शत्रु पुंजाजी चव्हाण याने हिंगोली ग्रामीण, सेनगाव, गोरेगाव व नर्सी नामदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांतील १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच यापूर्वीच्या चार गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या याच आरोपीकडून १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटकेतील आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही (Hingoli Turmeric Theft Case) कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपअधीक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोउपनि दिलीप मोरे, पोलीस अंमलदार प्रेमदास चव्हाण, कोंडीबा मगरे, संदीप जाधव, नितीन गोरे, विक्रम कुदनानी, सुभाष घुगे, साईनाथ कंठे, धनंजय क्षीरसागर, शिवाजी इंगोले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.