Hingoli Gutkha Mafia: हिंगोली पोलिसांनी शनिवार, ३० तारखेला बासंबा पाटीजवळ एका संशयित कारवर विशेष पथकाने कारवाई केली. कारची झडतीत डीबी सिग्नेचर, रजनीगंधा आणि इतर ब्रँडची लाखोंचा गुटखा झाला.
हिंगोली (Hingoli Gutkha Mafia) : हिंगोली-वाशीम मार्गावर पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शनिवार, ३० तारखेला दुपारी एकच्या सुमारास बासंबा पाटीजवळ पोलिस उपाधिक्षक मयूर रसाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका संशयित कारला अडवून तपासणी केली असता त्यातून लाखोंचा गुटखा सापडला.
पोलिस अधिक्षक निलाभ रोहन आणि अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपाधिक्षक मयूर रसाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिलीप मोरे यांच्यासह संदीप जाधव, धनंजय क्षिरसागर, नितीन गोरे व शिवाजी इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारची झडती घेतली असता पोत्यांमध्ये डीबी सिग्नेचर फिनेस्ट, रजनीगंधा, आरएमडी पान मसाला आणि एम सेन्टेड तंबाखू यांसारख्या ब्रँडचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह कार व एक मोबाईल असा एकूण ७.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या (Hingoli Gutkha Mafia) प्रकरणात जमादार संदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बासंबा पोलिस ठाण्यात सागर इंदोरीया आणि श्रध्दा जैस्वाल या दोघांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार व संतोष वाढोरे करत आहेत. जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.