Gutkha seizure Action: जिल्ह्यातील गुन्हे शाखेच्या कथित अवैध गुटखाविरुद्ध होणाऱ्या कार्वाईत एकूण ७ लाख८७ हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली (Gutkha seizure Action) : अवैध गुटखाविरोधात धडक मोहीम सुरू असल्याचे सांगत स्थानिक गुन्हे शाखेने ७ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली आहे. मात्र या ‘मोठ्या कारवाई’मागे खऱ्या साखळीपर्यंत पोलीस पोहोचले आहेत का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील जुमडा पाटी येथे कारवाई केली. यावेळी स्विफ्ट डीझायर कार क्रमांक MH 12 KN 6039 मधून ३ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला सापडला. कारसह एकूण ७ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख नासीर शेख सुलेमान , रा. मस्तानशहा नगर याला ताब्यात घेऊन बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरसम मार्गे हिंगोलीत येणाऱ्या लाखोंच्या मालासाठी फक्त एकच चालक जबाबदार आहे का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. हा माल कोणाने पाठवला, कोणाला द्यायचा होता आणि वाटेत कोणते नाके लागले याची कुठलीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. त्यामुळे मूळ सूत्रधार आणि पुरवठादार मात्र कारवाईच्या कचाट्यातून सुटले आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात गुटख्याचा अवैध धंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. तरीही गोपनीय माहिती केवळ जिल्ह्यात माल शिरल्यानंतरच का मिळते, सीमेवरच कारवाई का होत नाही, याबतही नागरिकांमध्ये नाराजी आहे. यामुळे माहिती देऊन सोयीनुसार कारवाई केली जाते का, असा संशय बळावला आहे. जप्तीच्या आकड्याबाबतही तफावत दिसून येते. ३.८७ लाखांचा गुटखा आणि ४ लाखांची कार मिळून एकूण आकडा ७.८७ लाखांपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे कारवाईचा गाजावाजा मोठा करण्यासाठी मुद्दाम आकडा फुगवला गेला आहे का, यावरही बोट ठेवले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखा दर काही दिवसांनी अशीच एखादी कारवाई करून आकडेवारी वाढवते. परंतु पानठेल्यांवर आजही प्रतिबंधित माल सहज उपलब्ध होतो. एका छोट्या वाहकाला पकडून संपूर्ण जाळी तोडल्याचे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का, आणि खऱ्या आर्थिक व्यवहारांवर तसेच संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, हा मूळ प्रश्न कायम आहे. जोपर्यंत या प्रकरणातील पुढील साखळी उघड होत नाही तोपर्यंत ही कारवाई म्हणजे केवळ वरवरचा मलमपट्टी असल्याची चर्चा हिंगोलीत जोर धरत आहे.