Wire theft case: 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर कापून लंपास
मलकापूर (Wire theft case) : तालुक्यातील भानगुरा गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर कापून लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रात्रीच्या सुमारास चोरीचा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी भानगुरा गावातील विविध शेतांमध्ये प्रवेश करून विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर कापून नेल्या. या चोरीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अनेक शेतकरी प्रभावित
या (Wire theft case) घटनेत प्रशांत बावस्कर, शांताराम चव्हाण, दिनेश बावस्कर, महेश बावस्कर, सुधाकर बावस्कर, बंडू वराडे, अतुल पाटील, दीपक पाटील, वासुदेव चव्हाण, रवींद्र टकले, कृष्णा बावस्कर, अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश बोंडे, गजानन बोंडे, मुरलीधर नप्ते, ईश्वर पाटील, जयसिंग चव्हाण यांसह इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण
सध्या तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पोलिसांचा धाक नसल्यामुळे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार; गस्त वाढविण्याची मागणी
या (Wire theft case) प्रकरणी भानगुरा येथील शेतकऱ्यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर व शहर प्रमुख हरिदास गणबास यांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांना अटक करावी व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
तातडीच्या उपाययोजनांची गरज
शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर या चोरीचा थेट परिणाम होत असून, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.