Youth Accidental death: संभाजीनगरकडे निघालेल्या अनिल सुर्वे यांचा रस्ते अपघातात रायखेडा पाटीजवळ मृत्यू झाला. त्याच्याशी असलेला मित्र संकेत बेले गंभीर जखमी झाला.
रायखेडा पाटीजवळ अज्ञात वाहनाची धडक; मित्र गंभीर जखमी
दाताडा बुद्रुक गावावर शोककळा
सेनगाव/ परभणी (Youth Accidental death) : भावाच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करून संभाजीनगरकडे निघालेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दि. ३१ मे रोजी सकाळी जालना रस्त्यावरील रायखेडा पाटीजवळ घडली. या अपघातात त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दाताडा बुद्रुक ता. सेनगाव, येथील अनिल देवीदास सुर्वे वय २५ वर्ष व त्यांचा मित्र संकेत दत्ता बेले वय २५ वर्ष, रा. पुसद हे शनिवारी दाताडा गावात आले होते. रात्री मुक्काम करून रविवारी पहाटे सुमारे पाच वाजता दुचाकीने संभाजीनगरकडे रवाना झाले. अनिल सुर्वे यांचा भाऊ मागील दीड महिन्यांपासून संभाजीनगर येथील रुग्णालयात कोमात असून त्याच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम घेऊन ते निघाले होते.
दरम्यान, जिंतूरमार्गे जात असताना रायखेडा पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. (Youth Accidental death) धडकेनंतर दोघेही रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख अजीज यांनी तपासणी करून अनिल सुर्वे यांना मृत घोषित केले. तर संकेत बेले यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अनिल सुर्वे यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. एका बाजूला भाऊ मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्या उपचारासाठी धावपळ करणाऱ्या भावाचाच अपघाती मृत्यू झाल्याने सुर्वे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या (Youth Accidental death) घटनेमुळे दाताडा बुद्रुक गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजाजी दळवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उद्धव माने व हरिभाऊ गायकवाड यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली.