Cyber Task Scam: वसमत तालुक्यातील एक वयस्क सायबर पोलिस ठाण्यावर दाखल झालेल्या आरोपीने सुधाकर अंभोरे यांना ऑनलाइन टास्क 'Watches of Switzerland' ह्या नावाखाली १४ लाख रुपयांची फसवणूक
सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली (Cyber Task Scam) : ऑनलाइन टास्क पूर्ण करून चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने वसमत तालुक्यातील कळंबा येथील एका व्यक्तीची तब्बल १४ लाख ३ हजार १७० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. “Watches of Switzerland” च्या नावाखाली ऑनलाइन टास्क या नावाचा वापर करून सायबर भामट्यांनी हा गंडा घातला आहे. याप्रकरणी हिंगोलीतील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील कळंबा येथील सुधाकर केशवराव अंभोरे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. २ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या टेलिग्राम आयडीवर “Watches of Switzerland” च्या नावाखाली ऑनलाइन टास्क या नावाने एक लिंक प्राप्त झाली. संबंधित व्यक्तींनी ऑनलाइन महागडी घड्याळे खरेदी करून त्यांना रेटिंग देण्याचे काम दिले. या कामाच्या बदल्यात गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. (Cyber Task Scam) सुरुवातीला सुधाकर अंभोरे यांनी लहान रक्कम गुंतवली असता आरोपींनी त्यांना नफ्यासह काही रक्कम परत केली. त्यामुळे सुधाकर अंभोरे यांचा विश्वास संपादन झाला. विश्वास बसल्यानंतर आरोपींनी अधिक महागडी घड्याळे खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये द्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून सुधाकर अंभोरे यांनी टप्प्याटप्प्याने रक्कम भरली.
यामध्ये १ लाख ९५ हजार रुपये, ४ लाख ६२ हजार ६०० रुपये आणि ३ लाख रुपयांच्या मोठ्या व्यवहारांसह इतर रकमा जमा केल्या. अशा प्रकारे एकूण १४ लाख ३ हजार १७० रुपये आरोपींनी सांगितलेल्या विविध खात्यांवर जमा झाले. २० टास्क पूर्ण झाल्यानंतर मुद्दल रक्कम व नफा एकत्रित परत मिळेल, असे आश्वासन आरोपींनी दिले होते. मात्र टास्क पूर्ण झाल्यानंतरही पैसे परत न करता उलट आणखी रक्कम भरण्याची मागणी आरोपींनी केली. पैसे भरण्यास नकार दिल्यानंतर आरोपींशी संपर्क होणे बंद झाले व आपली फसवणूक झाल्याचे सुधाकर अंभोरे यांच्या लक्षात आले. अशा प्रकारे “Watches of Switzerland” च्या नावाखाली ऑनलाइन टास्क व रेटिंगच्या आमिषाने सुधाकर अंभोरे यांची १४,०३,१७० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.