Land survey bribe: शेतजमिनीची मोजणी व पडताळणी करून देण्यासाठी ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
जळगाव (Land survey bribe) : शेतजमिनीची मोजणी व पडताळणी करून देण्यासाठी ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधिताविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ४९, व्यवसाय शेती) यांनी त्यांच्या शेतजमिनीच्या गट व पोटहिस्स्याची मोजणी व पडताळणी करण्यासाठी उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव येथे अर्ज करून शासकीय शुल्क भरले होते.
त्यानंतर राहुल ताराचंद कोळी (वय ३२), भूकरमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव यांनी हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराच्या भावांसमक्ष ७० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १७ जुलै रोजी एसीबीकडे करण्यात आली होती.तक्रारीची पडताळणी करताना डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील (वय ३२) याने नोटीस पाठविण्यासाठी स्टॅम्प शुल्क म्हणून ६२५ रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार बुधवारी तक्रारदाराच्या शेताची मोजणी करून झाल्यानंतर करंज येथील बसस्टॉपजवळ आरोपीने स्वतःसाठी व कार्यालयाच्या नावाखाली ७० हजार रुपये, दोन नोटिसांचे १,२०० रुपये आणि खाजगी मदतनीसासाठी ५०० रुपये, अशी एकूण ७१ हजार ७०० रुपयांची लाच मागितली व ती पंचांसमक्ष स्वीकारली.यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून राहुल कोळी याला रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद होताच अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसीबीने सांगितले.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.