आळंदा शिवारात वीज वाहिनीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भरधाव आग, शेतकऱ्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान. नुकसान भरपाईसाठी मागणी.
बार्शिटाकळी : तालुक्यातील आळंदा शिवारात वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्याने महावितरणकडे मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदा येथील रहिवासी सुरेश सहदेव वैराळे यांच्या स.नं. १३५ मधील शेतातून महावितरणची वीज वाहिनी गेली आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २ ते २.३० वाजताच्या दरम्यान या वाहिनीत अचानक शॉर्ट सर्किट झाले. ठिणग्या उडाल्यामुळे बोअरवेलजवळ ठेवलेल्या साहित्याला आग लागून ती वेगाने पसरली.
या आगीत ३० स्प्रिंकलर पाईप, ८ स्प्रिंकलर, बोअरवेलचे केसिंग पाईप (३ ते ४ फूट), २० फूट बोअर केबल, २ टी-बेंड, २ एन्ड कॅप आणि एक पाण्याची टाकी असे महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले.
या घटनेमुळे शेतकरी वैराळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यांनी ३० एप्रिल रोजी उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, उपविभाग बार्शिटाकळी यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे. संबंधित घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (ता.प्र.)