Chikhli Bus Stand Theft Case: चिखली बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन एका ८० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ आणि ओम चोरणाऱ्या आरोपीला चिखली पोलिस
चिखली (Chikhli Bus Stand Theft Case) : चिखली बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन एका ८० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ आणि ओम चोरणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने बीड येथे जाऊन मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी रामकृष्ण गणपतराव उपाध्ये (वय ८०, रा. उदेयनगर, चिखली) हे आपले मित्र गजानन दगडू दुधाळे यांच्यासोबत चिखली बसस्थानकावर बारशी ते शेगाव जाणार्या बसची वाट पाहत होते. दुपारी सुमारे ३ वाजता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन (Chikhli Bus Stand Theft Case) अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १३ ते १४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ (ज्यात सोन्याचा ओम होता) तोडून पळ काढला. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ठाणेदार पो.नि. भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. चिखली डी.बी. पथकाचे पोहेका अमोल गवई, पोका प्रशांत धंदर आणि निलेश सावळे हे १७ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीच्या शोधासाठी बीड येथे पोहोचले. तेथील गांधीनगर परिसरात आरोपी घरातून फरार असल्याचे समजताच पोलिसांना तो अण्णाभाऊ साठे चौकात असल्याची टीप मिळाली.
डी.बी. पथकाने तात्काळ चौकात धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव लक्ष्मण रामदास जाधवा असे सांगितले. अधिक चौकशीत त्याने चिखली बसस्थानकावरील चोरीची कबुली देत, चोरी केलेला सोन्याचा गोफ विकण्यासाठी जात असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडून १,७५,०००/- रुपये किमतीचा संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीला चिखली येथे आणून अटक करण्यात आली आहे.
ही (Chikhli Bus Stand Theft Case) यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भूषण गावडे, सपोनि राहुल लोखंडे, पोउपनि प्रविण मोरे, सचिन ठेग, अश्विनी गाडे, अमोल गवई, निलेश सावळे, अजय इटावा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, ललीता खरात आणि रुपाली उगले यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोहेका अमोल गवई व अजय इटावा करत आहेत.