अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत नागपूर व विदर्भातील गंभीर भाजलेल्या रुग्णांसाठी अधिक स्किन बँक व बर्न उपचार सुविधांची मागणी केली.
आमदार अभिजित वंजारी यांचा विधान परिषदेत प्रश्न
नागपूर (Maharashtra Healthcare) : नागपूर शहरासह विदर्भात वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गंभीर जखमी रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या स्किन बँक व बर्न उपचार सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा आमदार अभिजीत वंजारी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये असतानाही गंभीर भाजलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची कमतरता असल्याचे वंजारी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी सांगितले की, २०२५ आणि २०२६ या कालावधीत नागपूर शहर व परिसरात कंपन्यांमध्ये झालेल्या मोठ्या आगीच्या घटनांमध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये अनेक रुग्णांचे शरीर ९० टक्क्यांपर्यंत भाजले होते.
अशा गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये, विशेषतः ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले, असेहीत्यांनी सांगितले. सध्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी) येथील बर्न युनिटचे काम सुरू असल्याने ते बंद असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
विदर्भात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असताना स्किन बँक नसल्यामुळे गंभीर भाजलेल्या रुग्णांच्या उपचारात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. २०१७मध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ बर्न इंज्युरी (एनपीपीएमबीआय) या योजनेला मान्यता देऊन निधीही मंजूर केला होता. मात्र नागपूरमध्ये हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झालेला नसल्यामुळे रुग्णांना आजही त्रास सहन करावा लागत असल्याचे वंजारी यांनी निदर्शणास आणून दिले. आतातरी नागपूरसह विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये स्किन बँक प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सरकारने ठोस वेळापत्रक जाहीर करावे, तसेच आवश्यक उपकरणे व सुविधा कधी उपलब्ध करून देणार याबाबत सरकारने स्पष्ट करावे, असा सवाल आमदार अभिजीत वंजारी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.