Newborn baby death: जवळाबाजार तालुक्यातील नालेगाव येथे एक नवजात बाळाचा मृत्यू झाला. गर्भवती मनिषा इंगळे यांना रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे वेळेत हिंगोलीला नेण्यात आले
आज पर्यंतच्या सर्व घटनांमध्ये वैद्यकीय अधिकार्यांना वरिष्ठांकडून अभय
जिल्हा आरोग्य अधिकार्यांची सारवा सारव
जवळा बाजार (Newborn baby death) : औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी थेट आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवले असून डिझेलअभावी १०२ व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे आरोग्य प्रशासनाने डिझेल होते पण चालक नसल्याने अडचण झाल्याचा दावा केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे संतापाची लाट उसळली आहे.
नालेगाव येथील मनिषा इंगळे या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. मंगळवारी, २६ मे रोजी त्यांना अचानक पोटात त्रास सुरू झाला. गावातून जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचे पाच किलोमीटरचे अंतर नातेवाईकांनी दुचाकीवरून पार केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरजळकर यांनी तपासणी करून तातडीने हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तात्काळ १०२ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र डिझेल नसल्याचे कारण सांगण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे.
१०८ क्रमांकावरूनही वेळेत प्रतिसाद मिळाला नाही. अखेर नाईलाजाने खाजगी रुग्णवाहिका करून मनिषा यांना हिंगोलीला आणण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीअंती गर्भाशयात प्रमाणापेक्षा जास्त पाणी असल्याचे आढळले. डॉक्टरांनी तातडीने सिझेरीयन शस्त्रक्रिया केली, परंतु तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. वेळेत शासकीय रुग्णवाहिका मिळाली असती तर बाळ वाचले असते, असा आक्रोश नातेवाईकांनी केला आहे.या प्रकरणात आरोग्य विभागातर्फे सारवा - सारव करण्याचा प्रयत्न झाला. ज्यामध्ये या आरोपांवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी खुलासा केला. रुग्णवाहिकेत डिझेल होते, परंतु त्यावेळी चालक उपलब्ध नव्हता, असे त्यांनी सांगितले. १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचत होती.
मात्र त्यापूर्वीच नातेवाईकांनी खाजगी वाहनाने महिलेला हिंगोलीला नेले. डॉ. चव्हाण यांच्या मते, महिलेच्या गर्भाशयात अतिरिक्त पाणी होणे हे बाळाला व्यंग असल्याचे लक्षण आहे आणि त्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बालमृत्यूची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जवळा बाजार येथे विशेष पथक पाठवून वस्तुस्थितीचा अहवाल मागवण्यात येणार आहे. हा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर दोषींवर कारवाईचा निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एका निष्पाप बाळाचा मृत्यू आणि आरोग्य प्रशासन व नातेवाईकांचे परस्परविरोधी दावे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आरोग्य मंत्र्यांकडून दखल
नालेगाव येथील गर्भवती महिलेला रूग्णवाहीका वेळेवर उपलब्ध झाली नसल्याने तिचे बाळ दगावल्याचे नातेवाईकाडून सांगितले जात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री डॉ. प्रकाश आंबीटकर यांनी घेतली असुन या प्रकरणाचा चौकशी केली जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
जवळाबाजार हे गाव हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असून महामार्गावरील गाव असल्यामुळे येथे अपघात प्रसंगी उपयोगात येणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी गत दशक भरापासून आहे. मात्र येथे १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध असून ती सुद्धा कायमस्वरूपी नाही. कोरोना कालखंडामध्ये सिद्धेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका उसन्या स्वरूपात आणण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा परिषद गटनेते अंकुशराव आहेर यांच्या प्रयत्नातून सदर रुग्णवाहिका उपलब्ध झाली होती.