Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आरोग्य

हृदयविकार व मधुमेह आजारासाठी 'ब्रिस्क वॉकिंग' अत्यावश्यक

जलद गतीने फिरण्याचा व्यायाम सर्व प्रकारचे आजार दुरुस्त करतात. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार झपाट्याने वाढताना दिसत आहेत.


हृदयविकार व मधुमेह आजारासाठी ब्रिस्क वॉकिंग अत्यावश्यक

Heart Health |

(Heart Health) जलद गतीने फिरण्याचा व्यायाम सर्व प्रकारचे आजार दुरुस्त करतात. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये हृदयरोगआणि मधुमेह हे दोन प्रमुख आजार मानले जातात. अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा आणि अनियमित दिनचर्या या कारणांमुळे या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे पूर्वी प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळणारे हे विकार आज तरुण वयोगटातही दिसून येत आहेत. त्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. यामध्ये ब्रिस्क वॉकिंग (जलद चालणे) हा अत्यंत सोपा आणि परिणामकारक व्यायाम मानला जातो.

हृदयरोग हा आज जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण बनला आहे. धमन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि हृदयाला अधिक श्रम करावे लागतात. परिणामी हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत नियमित ब्रिक्स वॉकिंग केल्याने हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते. जलद चालण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी होण्यास आणि चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढण्यास मदत होते. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

मधुमेह हादेखील जीवनशैलीशी संबंधित गंभीर विकार आहे. शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होणे किंवा त्याचे योग्य प्रकारे कार्य न होणे यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि मधुमेह निर्माण होतो. नियमित ब्रिस्क वॉकिंग केल्याने शरीरातील पेशी ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे उपयोग करतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच नियमित चालण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते, वजन नियंत्रणात राहते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो तसेच आधीपासून असलेल्या मधुमेहाच्या रुग्णांनाही त्याचा मोठा फायदा होतो.

ब्रिस्क वॉकिंग म्हणजे साध्या चालण्यापेक्षा थोड्या जलद गतीने चालणे होय. चालताना श्वास थोडा वेगाने चालतो, पण बोलणे शक्य होते. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे दहा मिनिटांमध्ये अंदाजे एक किलोमीटर या गतीने चालणे. चालताना बोलू नये व नाकानेच श्वासोश्वास करावा. दररोज किमान ३० ते ७० मिनिटे किंवा तीन किलोमीटर ते सात किलोमीटर आपापल्या बलानुसार नियमित चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळी उठल्याबरोबर चहा वगैरे न पिता किंवा नाश्ता न करता चालणे अत्यंत फायद्याचे असते. सुरुवातीला हळूहळू चालण्याची सवय लावून नंतर गती वाढवावी. आरामदायी पादत्राणे वापरणे, सकाळी स्वच्छ हवेत चालणे आणि नियमितता ठेवणे हेदेखील महत्त्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये निरोगी जीवनासाठी दिनचर्या (Daily routine) आणि व्यायाम यांना विशेष महत्त्व दिले आहे. आयुर्वेदानुसार शरीरातील दोष (वात, पित्त आणि कफ) यांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असते. अतिआहार, जड व स्निग्ध पदार्थांचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे शरीरात कफ आणि मेदधातू वाढतात. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोगासारखे विकार निर्माण होऊ शकतात.

आयुर्वेदात नियमित चालणे किंवा व्यायाम केल्याने अग्नि (पचनशक्ती) सुधारते, शरीरातील साचलेला मेदधातू कमी होते आणि स्त्रोतोस (शरीरातील वाहिन्या) स्वच्छ राहतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावरचा ताण कमी होतो. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितलेल्या 'अर्धशत्क्त्या व्यायाम' या संकल्पनेनुसार आपल्या क्षमतेच्या अर्ध्या शक्तीपर्यंत व्यायाम करणे योग्य मानले जाते. ब्रिस्क वॉकिंग ही संकल्पना याच तत्त्वाशी सुसंगत आहे. याशिवाय आयुर्वेदामध्ये पंचकर्म, योग्य आहार-विहार, औषधी वनस्पती आणि जीवनशैलीतील सुधारणा यांच्या माध्यमातून मधुमेह व हृदयरोग नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला जातो. त्रिफळा, गुग्गुळ, अर्जुन, मेथी यांसारख्या औषधी वनस्पतींचा योग्य वैद्यकीय सल्ल्याने उपयोग केल्यास शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत होते.

एकंदरीत, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रिस्क वॉकिंग हा सर्व वयोगटांसाठी सोपा, सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम असून तो दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे गरजेचे आहे. आयुर्वेदाने सांगितलेल्या दिनचर्या, व्यायाम आणि संतु‌लित आहाराच्या तत्त्वांचे पालन केल्यास निरोगी आणि सक्रिय जीवन जगणे शक्य आहे. त्यामुळे 'चालणे हेच आरोग्याचे खरे औषध' हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारणे ही आजची गरज आहे.

डॉ. रूपाली कावरे
प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट (संचालिका) अमरावती,
मो.नं.-७०३८३७२२६६

Related to this topic: