सोरायसिस हा त्वचेचा एक दीर्घकालीन विकार आहे. आजच्या शारीरिक व मानसिक धकाधकीच्या जीवनशैलीत त्याचे प्रमाण वाढताना दिसते. त्वचेवर लालसर, खवलेदार चट्टे निर्माण होतात.
सोरायसिस आजाराची लक्षणे- त्वचेवर लालसर, उठावदार चट्टे पडणे, त्या भागावर पांढरे किंवा रुपेरी खवले येणे, त्वचेला कोरडेपणा व खाज येणे, काही वेळा त्वचा फुटणे व रक्तस्राव होणे, सांध्यांमध्ये वेदना(Psoriatic arthritis) होणे, तळहात, तळपायांना भेगा (Palmer psoriasis) पडणे.
हे चट्टे सामान्यतः कोपर, गुडघे, डोके, पाठ आणि नखांवर दिसतात.
सोरायसिसचे आजार उद्भवण्याची कारणे
मानसिक ताण असणे, अयोग्य आहार व जीवनशैली असणे, त्वचेवर झालेली इजा किंवा संसर्ग झालेला असणे, काही औषधांचे दुष्परिणाम.
आयुर्वेदात सोरायसिसचा संबंध मुख्यतः 'कुष्ठ' या विकाराशी जोडला जातो. विशेषतः 'एककुष्ठ' आणि 'किटिभ कुष्ठ' यामध्ये त्याचे साम्य दिसते. या विकारात त्रिदोषांपैकी पित्त व कफ दोषाचा प्रकोप प्रमुख असतो, तसेच रक्तदृष्टी ही मुख्य भूमिका बजावते.
अयोग्य आहार (विरुद्ध आहार), जास्त तिखट, आंबट, खारट, तळलेले पदार्थांचे सेवन, दही, मांसाहार, दुग्धजन्य पदार्थ यांचे अति सेवन यामुळे दोष बिघडतात आणि त्वचेचे विकार निर्माण होतात.
आयुर्वेदात सोरायसिसवर उपचार करताना केवळ लक्षणे कमी करण्यावर भर नसून मूळ कारणांवर काम केले जाते.
१. शोधन चिकित्सा - पंचकर्म ही आयुर्वेदातील मुख्य उपचार पद्धती असून सोरायसिसमध्ये अत्यंत प्रभावी ठरते.
वमन कर्म - कफ व पित्त दोष बाहेर काढण्यासाठी.
विरेचन कर्म- पित्त व रक्त शुद्धीकरिता
रक्तमोक्षण - दूषित रक्त काढण्यासाठी
जलौकावचरण (लीच थेरपी)- अशुद्ध रक्त कमी करण्याकरिता अत्यंत उपयुक्त.
सोरायसिस या आजारामध्ये वरच्यावर पंचकर्म करावे, त्यामुळे शरीरामध्ये दोष कुपीतच होणार नाहीत व आजार वाढणार नाही.
२. शमन चिकित्सा- औषधांच्या मदतीने दोष संतुलित केले जातात. खदिरारिष्ट, महामंजिष्ठादी काढा, आरोग्यवर्धिनी वटी, कामदुधा रस वटी, पंचतिक्त घृत, सारीवा, मंजिष्ठा, निंब ही औषधी त्वचेचे शुद्धीकरण करून नवीन पेशींची निर्मिती सुधारतात.
३. बाह्य उपचार- औषधी तेलांनी अभ्यंग विशेषता कुटज, लिंब, करंज या वनस्पतींपासून सिद्ध केलेले तेल. विविध औषधी द्रव्यांचे लेप, औषधी स्नान. सोरायसिसमध्ये योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. घ्यावयाचे पदार्थ- ताजे फळे व भाज्या, तुपाचा मर्यादित वापर, कडधान्ये व हलका आहार.
टाळावयाचे पदार्थ- दही, चीज, फास्ट फूड, अति तिखट, आंबट व खारट, तळलेले पदार्थ, मद्यपान व धूम्रपान टाळावे.
विहार - ताणतणाव कमी करणे (योग, ध्यान), नियमित व्यायाम, रात्री लवकर झोपणे, रात्रीची झोप सात ते आठ तास घेणे, त्वचेची स्वच्छता राखणे. सोरायसिस हा मनोकायिक व्याधी असल्यामुळे अनुलोम-विलोम, कपालभाती व भ्रामरी हे प्राणायाम करावेत. मनावर कार्य करण्याकरिता शवासन किंवा माईंड फुलनेस रिलॅक्सेशन किंवा ध्यान करावे. सोरायसिस या विकारावर योग्य आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म, आहार-विहार यांचे पालन केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. आयुर्वेद शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर काम करून रोगाच्या मूळ कारणांवर उपचार करतो. त्यामुळे दीर्घकालीन आराम व जीवनमानात सुधारणा मिळते. योग्य तज्ञ आयुर्वेद चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास सोरायसिसवर कायमस्वरूपी व सुरक्षित पद्धतीने मात करता येऊ शकते.
वैद्य पंकज कावरे
आयुर्वेद, पंचकर्म तज्ज्ञ
अमरावती, मो.नं.-९८२३०५१०३१