Unsown Farmland: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील पंधरा गावातील शेतशिवार खरीप पेरणीविना रिकामा काळाभोर दिसत असून उजाड शिवारामुळे शेतकरी धास्तावला आहे.
मारोती मुंजाळे
येरोळ (Unsown Farmland) : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील पंधरा गावातील शेतशिवार खरीप पेरणीविना रिकामा काळाभोर दिसत असून उजाड शिवारामुळे शेतकरी धास्तावला आहे. जुलै महिना संपत आला तरी पेरण्यायोग्य पाऊस न पडल्याने परिसरावर दुष्काळाची गडद छाया दिसून येत आहे.
गेली तीस वर्षात शेतकऱ्यांना पहिल्यांदा आशा भिषण गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत असून येरोळ परिसरात बोळेगाव, चामरगा, धामणगाव, कारेवाडी, नागेवाडी, डिगोळ, जांभळवाडी, सुमठाणा, दैठणा, पांढरवाडी, हणमंतवाडी परिसरात खरीप पेरणीकरिता दोन महिने झाले तरी पेरणी योग्य पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी राणांची मशागत करून, बाजारातील म्हागडे सोयाबीन बियाणे, रासायनिक खते, खरेदी करून पेरणीसाठी सज्ज होऊन बसले आहेत. आजही पावसाची पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून पाऊस पडण्याची प्रतीक्षा करत वाट पाहत आहेत.
आकाशात काळेभोर ढग जमा होतात, पण पाऊस काही पडत नाही. सोसाट्याच्या वा-याने ढग गायब होत असून यंदांचा वर्षे आर्थिक संकटाचा दिसत असून सर्वच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती शिवारातील विहीर, बोअर आटल्याने यंदा नव्याने लागवड केलेला ऊस वाळून जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात यंदा मोठी तूट येणार आहे. उसासाठी मोठा खर्च करुन पावसाअभावी ऊस उत्पादन हातचे जाण्याची शेतकऱ्यांना भिती निर्माण झाली आहे.
शिवारात चारा निर्माण झाला नाही. उपलब्ध चारा संपत आला. आता पशूधन कसे जगवायचे? असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभारले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. आषाढीला पाऊस पडेल अशी अनेक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र आषाढीलाही पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी आता हताश, निराश झाले आहेत मायबाप सरकारने दुष्काळ जाहीर करुन पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येरोळ व परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.