एक एकर १० गुंठे क्षेत्रात १७०० केळीची झाडे; पाणीटंचाईमुळे बागेतील ४०० झाडे काढण्याची वेळ
आखाडा बाळापूर (Hingoli Drought Crisis) : यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पाणीपातळी खोल गेल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले असून, शेतकऱ्यांना उभी पिके सोडून देण्याची वेळ येत आहे. कळमनुरी तालुक्यातील वरूड येथील शेतकरी ज्ञानेश्वर माधवराव जाधव यांच्या केळीच्या बागेलाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसला आहे. त्यांनी सर्वे नंबर ६०/१ मधील एक एकर १० गुंठे क्षेत्रावरील १७०० केळीच्या झाडांपैकी पाण्याअभावी ४०० झाडांवर रोटाव्हेटर फिरविले.
पाणीपातळी खोल गेली; अर्धा तास मोटार चालवूनही पाण्याची समस्या
यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे (Hingoli Drought Crisis) शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. ज्ञानेश्वर जाधव यांनी मोठ्या मेहनतीने केळीची बाग उभी केली होती. मात्र, पाणीपातळी खोल गेल्याने बागेला पुरेसे पाणी देणे कठीण झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोटार अर्धा तास चालवूनही पाण्याची समस्या कायम आहे. केळीच्या झाडांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने बागेतील झाडे जगविणे कठीण झाले. परिणामी, १७०० झाडांच्या बागेतील ४०० झाडांवर रोटाव्हेटर फिरविण्याचा कठोर निर्णय त्यांना घ्यावा लागला.
एक लाख रुपये खर्च; तरीही पाणीटंचाईचे संकट
एक एकर १० गुंठे क्षेत्रातील केळीच्या बागेसाठी आतापर्यंत सुमारे एक लाख रुपये खर्च झाला आहे. एका केळीच्या रोपासाठी सुमारे २७ रुपये खर्च आल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले. एवढा खर्च करूनही पाण्याअभावी झाडे काढण्याची वेळ आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. (Hingoli Drought Crisis) शेतकरी मोठ्या आशेने पिकांची लागवड करतो. पीक चांगले येईल आणि त्यातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा असते. मात्र, पाणीटंचाईमुळे उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.
कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात; मदतीची अपेक्षा
वरूड परिसरात पाणीटंचाई आणि खोल गेलेल्या भूजलपातळीमुळे शेतीसमोरील अडचणी वाढत आहेत. ज्ञानेश्वर जाधव यांच्या केळीच्या बागेतील ४०० झाडांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ येणे हे दुष्काळाच्या गंभीर परिणामांचे उदाहरण आहे. शासन आणि प्रशासनाने अशा परिस्थितीची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करावी आणि नियमानुसार मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.