औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील घटना
औंढा नागनाथ (Young Farmer Suicide) : तालुक्यातील वगरवाडी तांडा येथील तरुण शेतकरी आकाश पंढरीनाथ चव्हाण (२५) वर्षे याने सततची नापिकी व कुटुंबावरील कर्जबाजारी पणाला कंटाळून सात ऑक्टोबर रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेने तांड्यावर शोककळा पसरली आहे.
वगरवाडी तांडा येथील शेतकरी पंढरीनाथ चव्हाण यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्याकडे माळरानाची २ एकर जमीन आहे. आई-वडील मुल असा मोठा परिवार आहे.चव्हाण कुटुंबीयांवर महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच इतर असे पाच लाख कर्ज आहे. त्यातच यावर्षी पडलेल्या कोरड्या दुष्काळाने सोयाबीन सह इतर पिक करपून गेली. रोजगार हमी योजनेत मंजूर झालेल्या विहिरीचे उसनवारी करून काम केले परंतु अद्यापही त्याचे मस्टर निघाले नसून पैसे मिळाले नसल्याचे वडील पंढरीनाथ यांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबावरील कर्जाचा बोजा वाढला कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तरुण शेतकरी आकाश पंढरीनाथ चव्हाण हे होते. यादरम्यान त्यांनी ७ ऑक्टोबर रोजी शेतातील वाळलेले पीक पाहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
मुलगा घरी आला नसल्याने कुटुंबातील सदस्यांनी आजूबाजूला पाहिले यादरम्यान विहिरीवर चप्पल असल्याचे आढळून आल्याने शोध घेतला असता त्यांचा (Young Farmer Suicide) विहीरीत मृतदेह आढळला. मयत आकाश पंढरीनाथ चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, आजी, आजोबा, भाऊ, काका काकू असा मोठा परिवार आहे. या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. घटने प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.