शिंगणापूर सोयाबीन शेत

शिंगणापूर येथील दोन शेतकऱ्यांनी सोडले उभ्या सोयाबीन शेतात जनावरे

Shingnapur Soybean Farm: दोन कोरडवाहू शेतकऱ्यांनी पावसाअभावी तसेच जनावरांना चारा नसल्याकारणाने ८ एकर सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये  जनावरे चरण्यासाठी सोडून

शिंगणापूर येथील दोन शेतकऱ्यांनी सोडले उभ्या सोयाबीन शेतात जनावरे

Shingnapur Soybean Farm

 

कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडला कोरडवाहू शेतकरी

मानोरा (Shingnapur Soybean Farm) : तालुक्यातील शिंगणापूर (सिंगडोह) येथील दोन कोरडवाहू शेतकऱ्यांनी दि. ७ सप्टेंबर रोजी पावसाअभावी तसेच जनावरांना चारा नसल्याकारणाने आपल्या ८ एकर सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये  जनावरे चरण्यासाठी सोडून देत आक्रोश व्यक्त केला आहे. 

 सविस्तर असे की, मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेत मशागत, पेरणी, बी - बियाणे, खते, फवारणी औषधावर मोठा खर्च केला. संपूर्ण तालुक्यासह  शिंगणापूर (सिंगडोह) परिसरात मागील ४१ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. या भागात पावसाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर खरीपातील सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग ही पिके पावसाअभावी सुकत आहेत. शिंगणापूर येथील केरडवाहू शेतकरी किसन रेवासिंग चव्हाण यांच्या गट क्रमांक ३९ मधील ५ एकर व शेरसिंग परासराम चव्हाण यांचे गट क्रमांक २१ मधील ३ एकर सोयाबीनचे पिक पूर्णतः प्रखर उष्णतेने वाढल्याने उभ्या सोयाबीन पिकामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडून देत शेत मोकळे केले आहे. 

 महिना भरापेक्षा प्रदीर्घ पावसाने दांडी मारल्याने सर्वप्रथम पिकांची वाढ खुंटली व त्यानंतर पिके सोकल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक व विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी बांधावर पाहणीसाठी आला नसल्याचा  आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता तरी शासनाने दखल घेऊन प्रशासनाला आदेश देत कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी तसेच सर्व खरीप पिकांचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधीत शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने परिसरात कोरडा दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पूर्ण सोयाबीन वाया गेला आहे, तसेच जनावरांना सुद्धा चारा नाही, त्यामुळे उभ्या पिकामध्ये गुरे, ढोरे चरईसाठी सोडून शेत रिकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने पाहणी, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधीत शेतकऱ्यांनी केली आहे.
 -रेवासिंग चव्हाण, शेतकरी - शिंगणापूर (सिंगडोह)

टैग्स: Shingnapur Soybean Farm