मानोरा कोरडा दुष्काळ

कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या! 

Manora Drought: ऐन सोयाबीन, कपाशी व तूर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत असताना सोयाबीनला शेंगा कपाशीला पात्या लागण्याच्या अवस्थेत पाऊस गायब झाल्यामुळे कापूस व सोयाबीनची उभी पिके डोळ्यादेखत सुकू लागली आहेत..

कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या! 

Manora Drought

 

परिवर्तन शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

मानोरा (Manora Drought) : यावर्षी गेल्या महिनाभरापासून तब्बल ३५ ते ३६  दिवसांपासून कारंजा - मानोरा तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने. ऐन सोयाबीन, कपाशी व तूर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत असताना सोयाबीनला शेंगा कपाशीला पात्या लागण्याच्या अवस्थेत पाऊस गायब झाल्यामुळे कापूस व सोयाबीनची उभी पिके डोळ्यादेखत सुकू लागली आहेत. आधीच बोगस बियाण्यांमुळे  दुबार पेरणीचा फटका आणि आता पडलेला भीषण दुष्काळ यामुळे  कारंजा - मानोरा तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष देऊन तात्काळ कोरडा दुष्काळ (Manora Drought) जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे की, यावर्षी खरिपाच्या सुरुवातीलाच बाजारात आलेल्या बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाली. बियाणे न उगवल्यामुंळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून कर्ज काढून दुबार पेरणी करावी लागली. आता कुठे पिके सावरत असतानाच निसर्गाने पुन्हा दगा दिल्यामुळे मागील महिनाभरापासून निसर्ग कोपल्याने उन्हामुळे पिके करपून गेली आहेत.

कारंजा - मानोरा (Manora Drought) तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याने संपूर्ण जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त  घोषित करून दुबार पेरणीचा खर्च आणि संपूर्ण पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान १ लक्ष रुपयांची थेट आर्थिक मदत देवून पिकं विमा नियमांनुसार २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे मिळणारी २५ टक्के आगाऊ रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी मनोहर राठोड यांनी यांनी निवेदनातून केली आहे. तसेच कृषी मंत्र्यांनी तात्काळ या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात यावे, अन्यथा परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

टैग्स: Manora Drought