Vasmat Bazar Samiti: वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खरेदीदारांसाठी लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
खरेदीदारांसाठी नवीन नियम लागू; वसमत बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय
वसमत (Vasmat Bazar Samiti) : वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खरेदीदारांसाठी लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यात बीटामध्ये पाच रुपये नाही तर 25 रुपयांनी बोली वाढणार आहे तसेच त्वरित काटा करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली असून नियम भंग झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे बाजार समितीच्या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Vasmat Bazar Samiti) सभापती तानाजी पाटील बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे सर्वानुमते ठरलेल्या निर्णयासंदर्भात बाजार समितीचे सचिव सोपान शिंदे यांनी याबतची सूचना जारी केली आहे.
नवीन नियमानुसार यापुढे लिलाव कक्षामध्ये कुप्पा टाकूनच लिलाव केले जातील. लिलावाची बोली दररोज सकाळी ठीक 11 वाजता सुरू होणार आहे. खरेदीदारांनी खरेदी केलेल्या शेतीमालाचे वजन काटा त्याच दिवशी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लगेच काटा न झाल्यास तसे न केल्यास खरेदीदारास 100 रुपये प्रति पोते दंड आकारण्यात येणार आहे.
तसेच बीटा मध्ये शेतमालाची बोली ही 25 रुपयांच्या पटीतच वाढवता येणार आहे. यापूर्वी पाच रुपयाच्या पटीत वाढत होती शेतीमाल 'जसा आहे तसा'च खरेदी करावा लागणार असून मालाची साफसफाई करणे किंवा चुरी काढण्यास परवानगी राहणार नाही. बोली लावताना एन सी डी एक्सचे दर आणि शेतीमालाच्या दर्जानुसारच लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बाजार समिती प्रशासनाने सर्व खरेदीदारांनी या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन केले आहे. बैठकीसाठी सभापती उपसभापती संचालक मंडळ सचिव यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी शेतकरी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
19 हजार 505 रुपये सर्वोच्च दर
बाजार समितीने (Vasmat Bazar Samiti) नवीन नियम जाहीर केल्यानंतर झालेल्या बीटा मध्ये हळदीला सर्वोच्च 19 हजार पाचशे पाच रुपये दर मिळाला आहे वसमत मार्केट यार्ड हळदीची आवक वाढली असून हळदीचे दर वाढले असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. नव्या नियमावली मुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळणारच आहे खरेदीदारांचे हे काम व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने होऊन त्यांनाही त्याचा लाभ होईल त्यामुळेच नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती सभापती तानाजी पाटील बेंडे सचिव सोपान शिंदे यांनी देशोन्नती शी बोलताना दिली.