Hingoli Turmeric Market: हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या हजारो क्विंटल हळदीचे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक ताणात.
हिंगोली (Hingoli Turmeric Market) : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वार्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत उष्ण आणि दमट असलेल्या हवामानाने अवघ्या काही मिनिटांत रौद्र रूप धारण केले. जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले.
या अचानक आलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संत नामदेव हळद मार्केटला बसला. (Hingoli Turmeric Market) बाजार समितीत विक्रीसाठी आपला माल घेऊन आलेल्या शेतकर्यांची मोठी तारांबळ उडाली. सकाळपासूनच हळद विक्रीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले होते. हजारो क्विंटल हळद उघड्यावर पडून होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकर्यांना आपली हळद झाकण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणात हळद भिजल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भिजलेल्या हळदीचा रंग आणि प्रतवारी खालावल्याने बाजारभाव मिळणे कठीण होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
काही शेतकर्यांनी ताडपत्री आणि प्लास्टिकच्या साहाय्याने हळद वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र वार्याच्या वेगापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. दरम्यान, हवामान विभागाने याआधीच जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, पावसाची तीव्रता इतकी असेल याची कल्पना शेतकर्यांना नव्हती. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.