जिल्ह्यात ४३ हजार ५४१ पैकी ३२ हजार ५०३ शेतकर्यांनी ई - केवायसी प्रक्रीया पूर्ण
अद्यापपर्यंत ११ हजार ३८ शेतकर्यांची ई केवायसी प्रलंबित
हिंगोली (Hingoli e-KYC) : जिल्ह्यातील शासकीय योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने १३ आणि १४ ऑगस्ट रोजी ई - केवायसी बंधनकारक केली आहे. या सूचनेला पहिल्याच दिवशी शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिंगोली, कळमनुरी, डोंगरकडा आणि आखाडा बाळापूर येथील प्रमुख बँक शाखांमध्ये सकाळपासूनच शेतकर्यांची गर्दी दिसून आली.
जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Hingoli e-KYC) योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व लाभार्थी शेतकर्यांना संबंधित बँक शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आधार प्रमाणीकरणाद्वारे ई - केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शासकीय योजनांच्या लाभात अडचण येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने शेतकर्यांना विहित तारखेतच बँकेत जाण्याचे आवाहन केले आहे. प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोली येथील बँक ऑफ बडोदा शाखेत संजय नारायणराव बांगर युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत रामदास किशनराव बोंगर, स्टेट बँक ऑफ इंडिया एडीडी शाखेत मुकुंद मुंजाजी कदम आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिवाजी तातेराव जाधव हे संचालक उपस्थित होते. कळमनुरी येथे स्टेट बँक ऑफ इंडियासाठी नाईक शेख नजिब शेख मुजीब आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी बाळासाहेब प्रज्ञात सातव, डोंगरकडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियासाठी सुभाष अडकिणे तर आखाडा बाळापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियासाठी नारायण गंगाधर करंडे यांनी पहिल्या दिवशी बँकेत बसून शेतकर्यांची ई - केवायसी करून दिली.
बँक कर्मचार्यांच्या मदतीने सेवा केंद्र संचालकांनी आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण केले. अनेक शाखांमध्ये दुपारपर्यंत शेकडो शेतकर्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे दिसून आले. जिल्हा प्रकल्प प्रमुख महाआयटी हिंगोली गंगाधर लोंढे यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयालाही माहिती कळवण्यात आली आहे. प्रशासनाने शिल्लक असलेल्या शेतकर्यांनी १४ ऑगस्ट रोजी संबंधित बँक शाखेत जाऊन ई - केवायसी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा निबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.