हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : यंदा जिल्ह्यात दुष्काळ असल्याने शेतमालाच्या बाजारभावात तेजीचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाने चार हजार ६५ रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला. बाजारपेठेतील आवक घटल्याने गव्हाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, आठ दिवसांत क्विंटल मागे एक हजार रुपयांची तेजी आली आहे. मुलीने देखील उसळी घेतली असून दर ९ हजार ३७५ रुपये क्विंटल रुपयांवर गेले आहेत.
यंदा पावसातील खंड आणि कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. पाण्याची टंचाई, घटलेले उत्पादन आणि नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अशा परिस्थितीत शेतमालाच्या बाजारभावात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक ठरत आहे. दरम्यान, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याच्या दरात सध्या चढ-उतार सुरू आहेत. गव्हाला मिळणारा वाढीव दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक ठरत आहे. बाजारात गहु व तुरीची आवक कमी होत असल्याने व्यापाऱ्यांकडून उपलब्ध मालाला चांगली मागणी आहे. परिणामी, दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आठ दिवसांपूर्वी गव्हाचा दर तीन हजारांवर होता मात्र, या कालावधीत क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची वाढ झाल्याने गव्हाचा दर चार हजार ६५ रुपयांपर्यंत पोचला आहे. दुसरीकडे तुरीच्या दरातही तेजी कायम आहे. दरम्यान, आवक आणि मागणीतील बदलांमुळे दरांवर परिणाम होत आहे.