औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी सावळी येथील घटना
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Farmer suicides) : सततचा दुष्काळ, यावर्षी झालेली नापीकी हातातून गेलेले पीक आणि डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त झालेल्या एका तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी सावळी येथे घडली आहे. सुरज श्यामराव सांगळे (२१) रा. पार्डी सावळी असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुण शेतकर्याचे नाव आहे. २३ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतातील संपूर्ण सोयाबीनचे पीक वाया गेले . पीक तर हातातून गेलेच, पण घर बांधणीसाठी काढलेल्या कर्जामुळे कुटुंबावरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले होते. गेल्या १५ दिवसांपासून सुरज या आर्थिक विवंचनेत आणि तीव्र मानसिक तणावाखाली होता.यातून सुरजने राहत्या घरी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना समोर आली.अवघ्या २१ व्या वर्षीय तरूण शेतकर्याने नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याने पार्डी सावळी परिसरात आणि हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सुरज सांगळे याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे.