हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार ४४३ शेतकऱ्यांचा समावेश
हिंगोली (Farm Loan Waiver Yojana) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांची तिसरी यादी आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार ४४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिनांक १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या (Farm Loan Waiver Yojana) योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून यासाठी शासनाने महाआयटी यांची नियुक्ती केली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली होती. त्याचे संगणकीय संस्करण करून यापूर्वी २४ जुलै रोजी १६.९६ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी, दिनांक ११ सप्टेंबर रोजी ४.२० लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ३.५१ लाख शेतकऱ्यांची तिसरी यादी अशी आज अखेर एकूण २४.६७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तिसऱ्या यादीत विभागनिहाय सर्वाधिक लाभार्थी छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत. यामध्ये बीड ४७ हजार ८२७, छत्रपती संभाजीनगर १९ हजार १४०, धाराशिव १३ हजार ७००, हिंगोली १७ हजार ४४३, जालना २१ हजार ८७३, लातूर ५ हजार १४८, नांदेड ५१ हजार ७२५, परभणी २९ हजार ५९४ असे एकूण २ लाख ६ हजार ४५० शेतकरी आहेत. अमरावती विभागात अकोला ११ हजार ७०४, अमरावती ११ हजार २१४, बुलढाणा ४२ हजार १४४, वाशीम ५ हजार २१४, यवतमाळ १४ हजार ८०० असे एकूण ८५ हजार ७६ शेतकरी आहेत. नागपूर विभागात ३० हजार ७३८, नाशिक विभागात १४ हजार २४४, पुणे विभागात ११ हजार ९२८ तर कोकण विभागात २ हजार ७५६ शेतकरी पात्र ठरले आहेत. एकूण ३ लाख ५१ हजार १९२ शेतकरी या तिसऱ्या यादीत आहेत.
ही (Farm Loan Waiver Yojana) यादी कर्जमुक्तीची असून यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम दिनांक ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.
यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंबंधीत काही शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम २ लाखापेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहेत. तसेच योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमित करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.