शेतकऱ्याची व्यथा; बोअरवेल कोरड्या, झेंडूची बाग वाळली, पिके उद्ध्वस्त
सोलापूर (Solapur Drought situation) : अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता आणि हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज, उत्पादनासाठी केलेला खर्च आणि उत्पन्नाची अनिश्चितता यांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाच्या दौऱ्यात समोर आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील शेतकरी पुरुषोत्तम गायकवाड यांनी आपल्या शेतातील नुकसानीची माहिती देताना आर्थिक अडचणींचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर मांडला.
शेतीत मोठी गुंतवणूक करूनही पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत. बोअरवेलमध्ये खोलवर जाऊनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, अशी चिंता गायकवाड यांनी व्यक्त केली. (Solapur Drought situation) शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याची वेळ येत असल्याची व्यथाही त्यांनी मांडली.
केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष शेतांची पाहणी
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुस्वामी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथक सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहे. या पथकात पेयजल व स्वच्छता विभागाचे अधिकारी अफसर अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाहणी पूर्ण केल्यानंतर पथकाने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळे आणि पानगाव येथे शेतांमध्ये जाऊन पिकांच्या स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे लक्ष्मण जाधव आणि पुरुषोत्तम गायकवाड यांच्या शेतांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी (Solapur Drought situation) करण्यात आली.
झेंडू आणि तुरीच्या पिकांवर संकट
पुरुषोत्तम गायकवाड यांच्याकडे स्वतःची चार एकर जमीन असून, ते गावातील सुभाष जाधव यांची आणखी आठ एकर जमीन कसतात. स्वतःच्या शेतातील एका एकरात त्यांनी झेंडूची लागवड केली होती, तर दोन एकरांवर तूर पेरली होती. भाडेतत्त्वावर कसत असलेल्या आठ एकर क्षेत्रात ‘गोदावरी’ जातीच्या तुरीची लागवड करण्यात आली होती.
झेंडूच्या एका एकरातील लागवडीसाठी त्यांनी सुमारे सहा हजार रोपे आणली होती. रोपे, खते, औषधे आणि मजुरी यांसह एकरी अंदाजे 75 ते 80 हजार रुपये खर्च झाला. या पिकातून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसाअभावी झेंडूची बाग वाळल्याने अपेक्षित उत्पन्नावर पाणी फिरले. तुरीच्या पिकासाठीही मशागत, पेरणी आणि कोळपणी यांसारख्या कामांवर सुमारे सव्वा लाख रुपये खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली. पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे न झाल्याने हा खर्च वसूल होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
खोल बोअरवेल असूनही पाण्याचा प्रश्न कायम
शेतीला पाणी मिळावे म्हणून बोअरवेल खोदण्यात आली; मात्र सुमारे 300 फूट खोलीपर्यंत जाऊनही पुरेसे पाणी उपलब्ध झाले नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. पावसाचा अभाव आणि सिंचनासाठी पाणी नसल्याने पिके वाचवणे कठीण झाले. त्यामुळे शेतीसाठी केलेली गुंतवणूक आणि अपेक्षित उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. (Solapur Drought situation) शेतीचे नुकसान झाल्यानंतरही बँकेच्या कर्जाची परतफेड, घरखर्च आणि पुढील हंगामाची तयारी या जबाबदाऱ्या कायम राहतात. त्यामुळे आर्थिक मदत आणि पीक नुकसानीचे योग्य मूल्यमापन होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
केंद्रीय पथकाच्या पाहणीमुळे (Solapur Drought situation) जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. मात्र, पाहणीनंतर कोणते निर्णय घेतले जातात आणि पात्र शेतकऱ्यांना किती मदत मिळते, याबाबत उत्सुकता आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि वाढता शेतीखर्च यामुळे शेतकऱ्यांसमोरील आर्थिक आव्हाने अधिक तीव्र झाली आहेत. त्यामुळे नुकसानीचे वास्तववादी मूल्यांकन करून मदतीबाबत वेळेत निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.