अवघ्या ५८ गुंठे जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह;
नापिकीमुळे मुलींचे शिक्षण आणि लग्नाच्या चिंतेने कुटुंब विवंचनेत
सेनगाव (Drought-Affected farmers Suicides) : दुष्काळी परिस्थिती आणि शेतीसमोरील संकटांच्या पार्श्वभूमीवर सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान पांडुरंग खिल्लारे (वय ४५) यांनी सोमवारी ता. १२ रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अवघ्या ५८ गुंठे जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समाधान खिल्लारे यांची आडोळ गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ५८ गुंठे शेती आहे. याच कोरडवाहू जमिनीवर त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मागील अनेक वर्षांपासून ते शेतातील आखाड्यावर कुटुंबासह वास्तव्यास होते. अल्पशा शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीत नापिकी झाल्याने खिल्लारे कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. एकीकडे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळली असताना, दुसरीकडे मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी कशी पार पाडायची, याची चिंता त्यांना सतावत होती. अत्यल्प जमीन आणि शेतीवरील वाढत्या संकटांमुळे कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर घडलेल्या त्यांच्या मृत्यूमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
सोमवारी सकाळी त्यांच्या पत्नी उठल्या असता समाधान घरात दिसून आले नाहीत. त्यांनी परिसरात शोध घेतला असता शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळले. हा प्रकार पाहताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिट जमादार चाटसे, पोलिस पाटील राजपाल चिंताळे यांनी भेट दिली. तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मस्के यांना घटनास्थळी भेट दिली.
समाधान खिल्लारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. मोठी मुलगी नांदेड येथे शिक्षण घेत असून, अन्य दोन मुली माध्यमिक शिक्षण घेत आहेत. मुलगा शेतीकामात वडिलांना हातभार लावत होता. कुटुंबाचा आधार हरपल्याने खिल्लारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुष्काळ, नापिकी आणि मर्यादित शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न या घटनेने पुन्हा अधोरेखित झाला आहे.