गांधारी मंडलमध्ये SBI च्या एटीएमवर पहाटे दरोडा; एकाने बाहेर पहारा दिला, तर दोघांनी मशीन कापून रोकड पळवली
तेलंगणा : एटीएममधील रोकड चोरण्यासाठी चोरट्यांनी वेषांतराची अनोखी युक्ती वापरल्याची घटना तेलंगणात समोर आली आहे. चेहरा लपवण्यासाठी मास्क आणि अंगात नाईटी घालून आलेल्या तीन चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम गॅस कटरच्या मदतीने फोडले. या घटनेत मशीनमध्ये असलेली सुमारे २५ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
तेलंगणातील गांधारी मंडल मुख्यालयात रविवारी पहाटे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती वाहनातून SBI च्या एटीएमजवळ पोहोचल्या. ओळख पटू नये आणि पोलिसांच्या नजरेतून सुटता यावे, या उद्देशाने त्यांनी चेहऱ्यावर मास्क आणि अंगात नाईटी घातली होती.
एकाने पहारा दिला, दोघांनी गॅस कटरने एटीएम फोडले
एटीएममध्ये चोरी करण्यासाठी तिघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हालचाल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यापैकी एक जण बाहेर थांबून परिसरावर लक्ष ठेवत होता. उर्वरित दोघांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या साहाय्याने मशीन कापले आणि त्यातील रोकड काढून घेतली. त्यानंतर पैसे घेऊन तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.
सकाळी एटीएम फोडल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
Thieves wearing Nighties robbed SBI ATM in Telangana. Watch full video of robbery. https://t.co/6Y5I9fHIEb
— Hellobanker (@Hellobanker_in) October 12, 2026
एटीएममध्ये २५ लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज
गांधारी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. महेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी संबंधित एटीएममध्ये ३० लाख रुपये भरण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ग्राहकांनी अंदाजे पाच लाख रुपये काढले असावेत. त्यामुळे एटीएममध्ये सुमारे २५ लाख रुपये शिल्लक असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र, चोरीला गेलेल्या रकमेचा अधिकृत आकडा अद्याप निश्चित झालेला नाही. एटीएममधील व्यवहारांची तपासणी आणि पुढील चौकशीनंतर नेमकी रक्कम स्पष्ट होणार आहे.
CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. काही फुटेजमध्ये नाईटी घातलेले दोन संशयित एटीएम मशीन कापल्यानंतर पैशांची बॅग घेऊन पळताना दिसत असल्याची माहिती आहे. मात्र, या व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही.
आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. वेषांतर करून एटीएम फोडण्याच्या या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आता सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.