मुंबई आणि प्रयागराज पोलिसांची संयुक्त कारवाई; घरातील खोलीची जमीन खोदून ड्रम बाहेर काढले, चार जण ताब्यात
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान जमिनीखाली लपवून ठेवलेले तीन निळे ड्रम आढळले असून, त्यात ५०० रुपयांच्या नोटांची शेकडो बंडले सापडली आहेत. जप्त केलेली रोकड चार ते पाच कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पैशांचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरई रामनगर गावात बुधवारी संध्याकाळी उशिरा मुंबई आणि प्रयागराज पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. राजेश यादव आणि राकेश यादव ऊर्फ महाकाल यांच्या घराची झडती घेताना पोलिसांनी एका खोलीतील जमीन खोदली. त्यावेळी जमिनीखाली लपवलेले तीन निळे ड्रम बाहेर काढण्यात आले. हे ड्रम उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांची बंडले असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच एडीसीपी पुष्कर वर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी गावातील चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
प्रयागराज: नवाबगंज थाना क्षेत्र के बरईपुर रामनगर गांव में एक मकान के अंदर जमीन में गाड़ कर तीन ड्रमों में भारी मात्रा में नकदी बरामद की गई है। शुरूआती गिनती में 5 करोड़ से ज्यादा कैश बताया गया है! #prayagraj #news #crimenews https://t.co/XGexKQu1PW
— अजय सरोज (पत्रकार) (@journalistsaroj) October 29, 2026
मुंबई पोलिसांच्या तपासादरम्यान रोकड जप्त
प्राथमिक माहितीनुसार, एका गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी राकेश यादव याला अटक करण्यासाठी आणि संबंधित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक प्रयागराजमध्ये आले होते. नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरई रामनगर गावात शोधमोहीम राबवताना ही रोकड सापडली.
पोलिसांनी जप्त केलेली रक्कम ड्रमसह व्हिडिओग्राफी करून मालखान्यात जमा केली आहे. गंगानगरचे डीसीपी सोनम कुमार यांनी याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित विभागांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
पुण्यात वास्तव्यास असलेल्या व्यक्तीचा उल्लेख
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश यादवचा भाऊ बबलू यादव अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होता. २०२० मध्ये कोरोना संसर्गाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान तो गावात परतला होता. त्यावेळी त्याच्यासोबत दोन मेहुणे आणि एक साडूही आले होते. प्राथमिक माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली रक्कम त्यांच्यामार्फत आणली गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
पैशांचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू
तीन ड्रममध्ये सापडलेल्या रोकडचा नेमका आकडा, ती कुठून आणण्यात आली आणि घरात जमिनीखाली लपवून ठेवण्यामागे काय कारण होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी करून या पैशांचा स्रोत आणि संबंधित गुन्ह्याशी असलेला संभाव्य संबंध शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तपासाच्या निष्कर्षांनंतरच या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.