टी. एन. शेषन, एम. एस. गिल यांच्यासह माजी निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा दाखला देत गोयल यांची काँग्रेसवर टीका; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरून राजकीय संघर्ष तीव्र
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने आपल्या सत्ताकाळातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि त्यांना मिळालेल्या राजकीय पदांचा इतिहासही तपासावा, असा आरोप गोयल यांनी केला.
#WATCH | Delhi: Asking 10 questions to Lok Sabha LoP Rahul Gandhi, Union Minister Piyush Goyal says, "I challenge Rahul Gandhi to answer these 10 questions...Several people consider Rahul Gandhi the biggest red flag because of whom the Congress is losing again and again. Youth calls bad omen, a red flag. Rahul Gandhi is the biggest red flag for Congress..." He also says, "Rahul Gandhi and his colleagues misbehaved with a woman journalist who is 3 months pregnant...She was only covering their protest. I don't think the 140 crore people of the country or any journalist would ever forgive this..."
— ANI (@ANI) October 13, 2026
टी. एन. शेषन यांच्या उमेदवारीचा दाखला
पत्रकार परिषदेत बोलताना पीयूष गोयल यांनी काँग्रेसच्या कार्यकाळातील काही माजी निवडणूक आयुक्तांची उदाहरणे दिली. टी. एन. शेषन यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करणाऱ्या काँग्रेसने त्यांनाच 1999 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडणूक आयोगातील सेवेनंतर राजकीय पक्षाकडून मिळालेली उमेदवारी हा त्यांच्या सेवेचा राजकीय मोबदला होता का, असा सवाल गोयल यांनी उपस्थित केला.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एम. एस. गिल यांचाही त्यांनी उल्लेख केला. गिल यांनी 1996 ते 2001 या कालावधीत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले. गोयल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना 2000 मध्ये पदावर असतानाच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवृत्तीनंतर तीन वर्षांनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2004 मध्ये ते राज्यसभेवर गेले आणि 2008 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. या घटनांचा संदर्भ देत गोयल यांनी घटनात्मक पदांवरील व्यक्तींना राजकीय लाभ दिले जात असल्याचा आरोप काँग्रेसवर केला.
‘मदत करा आणि पद मिळवा’ धोरणाचा आरोप
काँग्रेसवर टीका करताना गोयल यांनी इतर राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचाही संदर्भ दिला. केरळचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी टीकाराम मीना यांना निवृत्तीनंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत स्थान देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच, केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी रतन यू. केळकर यांना निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी मुख्य सचिव म्हणून घोषित केल्याचे गोयल यांनी नमूद केले.
2005 मध्ये नवीन चावला यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या वेळी सोनिया गांधी सरकारमध्ये नसतानाही या नियुक्तीबाबत त्यांची भूमिका काय होती आणि प्रत्यक्षात सरकार कोण चालवत होते, असा सवाल गोयल यांनी केला.
राहुल गांधींच्या बैठकीपूर्वी भाजपचा हल्लाबोल
दरम्यान, इंडिया आघाडीच्या नेत्यांशी पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता होती.
या पार्श्वभूमीवर पीयूष गोयल यांनी काँग्रेसच्या जुन्या निर्णयांचा संदर्भ देत पक्षावर टीका केली. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादाला आता भाजप आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांची धार मिळाली आहे.