Nevada Forest Fire: अमेरिकेतील नेवाडा-कॅलिफोर्निया सीमेजवळील उत्तर-पश्चिम नेवाडातील रेनो शहराच्या दिशेने जंगलातील आग वेगाने पसरत आहे. आगीत किमान सहा जण जखमी झाले..
वॉशिंग्टन (Nevada Forest Fire) : अमेरिकेतील नेवाडा-कॅलिफोर्निया सीमेजवळील उत्तर-पश्चिम नेवाडातील रेनो शहराच्या दिशेने जंगलातील आग वेगाने पसरत आहे. आगीत किमान सहा जण जखमी झाले असून, सुमारे ४२ हजार नागरिकांना परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी लागलेली ही आग रविवारी १३ हजार एकरांहून अधिक क्षेत्रात पसरली.
अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी ती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. (Nevada Forest Fire) जखमींमध्ये तीन नागरिक आणि तीन आपत्कालीन सेवा कर्मचारी आहेत. आगीत अनेक इमारती आणि अन्य बांधकामे नष्ट झाली आहेत. वाशो काउंटीमध्ये रविवारी सुमारे १० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. जोरदार वाऱ्यामुळे कोरड्या वनस्पतींना आग लागून ती वेगाने पसरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.नेवाडाचे गव्हर्नर जो लोम्बार्डो यांनी वाशो काउंटीमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
बचाव पथके आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरम्यान, जुलैमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियातही जंगलातील आगीने सुमारे २,७०० एकर क्षेत्र बाधित केले होते. गव्हर्नरांनी रविवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा नागरिकांना इशारा दिला. (Nevada Forest Fire) आगीशी संबंधित परिस्थिती अद्याप वेगाने बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभावित भागात असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि परिस्थितीबाबत मिळणाऱ्या ताज्या माहितीकडे सातत्याने लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.