Mount Everest Helicopter Crash

माऊंट एव्हरेस्टजवळ दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; भारतीय नागरिकाचा मृत्यू, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर!

नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ दोन हेलिकॉप्टरची टक्कर; दुर्घटनेत भारतीय नागरिकाचा मृत्यू, तर इतर दोघे जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त.

माऊंट एव्हरेस्टजवळ दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; भारतीय नागरिकाचा मृत्यू, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर!

नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील फेरिचे गावाजवळ अपघात; एकाच ठिकाणी लँडिंग करण्याच्या प्रयत्नात दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकली

नेपाळमधील जगप्रसिद्ध माऊंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, इतर दोघे जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ लँडिंगसाठी प्रयत्न सुरू असताना दोन्ही हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक बसली. या घटनेमुळे नेपाळमधील पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नेपाळच्या सोलुखुंबू जिल्ह्यातील बर्फाच्छादित परिसरात ही दुर्घटना घडली. पोलिसांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, एव्हरेस्ट परिसरात उतरण्याच्या तयारीत असलेली दोन छोटी हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली आणि त्यानंतर जमिनीवर कोसळली. या दुर्घटनेत एका परदेशी नागरिकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एक व्यक्ती जखमी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे समजते.

सोलुखुंबू जिल्ह्याचे पोलीस प्रभारी नवीन राजा बुधाथोकी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. एका परदेशी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरच्या टक्करचे थरारक दृश्य

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून, त्यामध्ये दुर्घटनेचा भीषण क्षण कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक हेलिकॉप्टरच्या लँडिंगची प्रतीक्षा करताना दिसतात. याचदरम्यान दोन हेलिकॉप्टर एकाच वेळी घटनास्थळी दाखल होतात आणि अचानक त्यांची जोरदार धडक होते. या टक्करमुळे दोन्ही हेलिकॉप्टरचे नुकसान होऊन त्यांचे अवशेष जमिनीवर विखुरले जातात. हा प्रकार घडताच परिसरात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

फेरिचे गावाजवळ सकाळी ८.१५ वाजता दुर्घटना

बीबीसी नेपाळीच्या वृत्तानुसार, एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळील फेरिचे गावात सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टी या दोन कंपन्यांची हेलिकॉप्टर एकाच ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी दोन्ही हेलिकॉप्टरची टक्कर झाली.

नेपाळमध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटक, गिर्यारोहक तसेच दुर्गम भागात आवश्यक रसद पोहोचवण्यासाठी लहान हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीतही या हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. मात्र, नेपाळमधील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि प्रतिकूल हवामानामुळे अशा भागांमध्ये हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि लँडिंग करणे आव्हानात्मक मानले जाते.

संबंधित सामग्री

अमेरिकेत हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; तिघांचा मृत्यू

अमेरिकेत हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; तिघांचा मृत्यू

अमेरिकेतील ओरेगनमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर होऊन भीषण दुर्घटना घडली. फ्लाइट इन्स्ट्रक्टरसह तिघांचा मृत्यू; NTSB आणि FAA कडून तपास सुरू.

Oct 30, 2026
हिंगोलीच्या १३ वर्षीय निपुण अग्रवालने सर केले एव्हरेस्ट बेस कॅम्प

हिंगोलीच्या १३ वर्षीय निपुण अग्रवालने सर केले एव्हरेस्ट बेस कॅम्प

Mountaineer Nipun Aggarwal: १३ वर्षीय निपुण अग्रवालने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी गिरीरोहण केले, त्याने मराठवाड्यातील सर्वात कमी वयाचा गीर्यारोहक म्हणून इतिहास रचला.

May 26, 2026