Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची बृष्टी मुखर्जी हिचा मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील घरात मृत्यू झाला.
कोलकाता (Mamata Banerjee) : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची बृष्टी मुखर्जी हिचा मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील घरात मृत्यू झाला. रामपूरहाट परिसरातील कुसुंबा गावातील घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. बृष्टी २८ वर्षांची होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, बृष्टी काही वर्षांपासून नैराश्यावर उपचार घेत होती. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या प्रकरणानंतर सरकारी अनुदानित शाळांमधील भरती रद्द करण्यात आली होती. त्याचा परिणाम बृष्टीच्या नोकरीवरही झाला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, तिच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि पुढील तपासातून स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.