केरळमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना घडली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला.
प्रचारादरम्यान ताफ्यावर हल्ला; हल्लेखोरांचा हेतू संशयाच्या भोवऱ्यात
केरळ (Leader Convoy Attack) : केरळमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना घडली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना हा प्रकार घडल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यात ही घटना घडली. वांडूर येथे आयोजित प्रचार सभेसाठी जात असताना तिरुवल्ली–चेल्लिथोडू पुलाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी थरुर यांच्या ताफ्याला अडवले. त्या वेळी ते दोन वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत होते.
घटनेदरम्यान सुमारे आठ जणांनी अचानक रस्त्यावर अडथळा निर्माण करून गाड्या थांबवल्या. हल्लेखोरांनी वाहनांच्या काचा ठोठावून गोंधळ घातला. त्यानंतर थरुर यांच्या सुरक्षारक्षकाला बाहेर ओढून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यात थरुर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
या प्रकरणी अंगरक्षकाच्या तक्रारीवरून वांडूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, हल्ल्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी कालिकावू परिसरातील एका संशयिताविरुद्ध अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता याचा तपास सुरू आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता की अचानक झालेल्या वादातून घडला, याबाबत पोलीस विविध अंगांनी चौकशी करत आहेत.
दरम्यान, राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एलडीएफ, यूडीएफ आणि एनडीए यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रचारादरम्यान घडलेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे