दिल्लीतील CJP आंदोलनापूर्वी मोठी हालचाल! ५७ मेट्रो स्टेशन्सची प्रवेशद्वारे बंद करण्याची पोलिसांची मागणी
नवी दिल्ली : जंतर-मंतरवर १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (DMRC) पत्र पाठवले आहे. या पत्रातून ५७ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.
मेट्रो प्रशासनाने या प्रस्तावावर अद्याप काय निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आधीच खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. १० ऑक्टोबरला जंतर-मंतरसह नवी दिल्लीतील इतर ठिकाणीही आंदोलने होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
५७ मेट्रो स्थानकांचे गेट बंद करण्याची विनंती
दिल्ली पोलिसांनी DMRC कडे केलेल्या विनंतीनुसार, संबंधित ५७ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्याचा प्रस्ताव आहे. हे निर्बंध लागू झाल्यास प्रवाशांना संबंधित स्थानकांवरून मेट्रोमध्ये प्रवेश करता येणार नाही किंवा बाहेर पडता येणार नाही.
९ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजल्यापासून हे दरवाजे बंद करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ते पुन्हा खुले करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, संबंधित मार्गांवरील मेट्रो गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्याचाही विचार पोलिसांनी मांडला आहे.
मात्र, हे निर्बंध प्रत्यक्षात लागू होणार का, किती काळ लागू राहणार आणि कोणत्या स्थानकांवर त्यांची अंमलबजावणी होणार, याबाबत DMRC कडून अधिकृत निर्णय अद्याप समोर आलेला नाही.
८ ऑक्टोबरला DMRC ला पाठवले पत्र
दिल्ली पोलीस ट्रान्सपोर्ट रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त रजनीश गुप्ता यांनी ८ ऑक्टोबर रोजी हे पत्र पाठवले होते. पत्रात DMRC चे व्यवस्थापकीय संचालक विकास कुमार यांचा उल्लेख आहे. ९ आणि १० ऑक्टोबर रोजी मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद ठेवण्यासंदर्भात ही विनंती करण्यात आली आहे.
या पत्राची प्रत पोलीस आयुक्तांचे ओएसडी, DMRC चे मुख्य सुरक्षा आयुक्त सुवाशीष चौधरी, स्पेशल सीपीचे एसओ आणि डीसीपी मेट्रो यांनाही पाठवण्यात आली आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहे.
अनियंत्रित जमाव संवेदनशील ठिकाणी जाण्याची भीती
दिल्ली पोलिसांनी मेट्रो स्थानकांवर निर्बंध घालण्यामागील कारणही पत्रात स्पष्ट केले आहे. १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर आणि नवी दिल्लीतील अन्य ठिकाणी आंदोलने प्रस्तावित आहेत. या आंदोलनांदरम्यान मोठा किंवा अनियंत्रित जमाव संवेदनशील ठिकाणांच्या दिशेने जाऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित मार्गांवरील मेट्रो गाड्यांच्या फेऱ्या कमी करणे तसेच काही स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद ठेवण्याचे उपाय सुचवण्यात आले आहेत.
आता दिल्ली पोलिसांच्या या विनंतीवर DMRC काय निर्णय घेते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. मेट्रो सेवांबाबत कोणतेही निर्बंध लागू झाल्यास त्याचा परिणाम प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर होण्याची शक्यता आहे.