India Science Research: झारखंडमधील जमशेदपुरजवळ वैज्ञानिकांना तब्बल 3.5 अब्ज (350 कोटी) वर्षे जुन्या खडकामध्ये पृथ्वीवरील जीवनाचे सर्वात प्राचीन संकेत अर्थात सूक्ष्म जीव सापडले आहेत.
350 कोटी वर्षे जुन्या पाषाणात सापडले सृष्टीचे मोठे रहस्य
जमशेदपुर (India Science Research) : भारताच्या संशोधकांनी विज्ञान जगताला थक्क करणारा एक अत्यंत दुर्मिळ शोध लावला आहे. झारखंडमधील जमशेदपुरजवळ वैज्ञानिकांना तब्बल 3.5 अब्ज (350 कोटी) वर्षे जुन्या खडकामध्ये पृथ्वीवरील जीवनाचे सर्वात प्राचीन संकेत अर्थात सूक्ष्म जीव सापडले आहेत. या ऐतिहासिक शोधामुळे पृथ्वीच्या निर्मिती आणि जीवसृष्टीच्या इतिहासाचे नवे पर्व जगासमोर आले आहे.
जमशेदपुरजवळ सापडला अमूल्य खजिना
झारखंडमधील जमशेदपुरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘भीतरदारी’ गावाजवळ हा शोध लागला आहे. दिसायला हा खडक अगदी साधा, काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्टेरी पट्ट्यांचा वाटतो. मात्र, त्याच्या आत दडलेले रासायनिक आणि आण्विक संकेत असे दर्शवतात की, जेव्हा आपली पृथ्वी आकार घेत होती, तेव्हाच या भागात सूक्ष्म जीव अस्तित्वात होते. (India Science Research) पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या पुराव्यांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची शोधमोहीम मानली जात आहे.
संशोधनातून काय समोर आले?
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या (India Science Research) वरिष्ठ वैज्ञानिक त्रिस्रोता चौधरी गेल्या अनेक वर्षांपासून झारखंडच्या सिंहभूम क्षेत्रात संशोधन करत आहेत. या संशोधनादरम्यान त्यांना सिलिकापासून बनलेल्या एका खडकात अतिशय पातळ काळ्या आणि पांढऱ्या रेषा दिसून आल्या. जेव्हा या काळ्या थरांची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यात प्राचीन कार्बनचे अस्तित्व असल्याचे निष्पन्न झाले. या पाषाणाचे नमुने भारत, अमेरिका आणि युरोपमधील सर्वोच्च प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले. तिथे ‘कार्बन आइसोटोप तंत्रज्ञानाद्वारे’ करण्यात आलेल्या तपासणीतून हा खडक 350 कोटी वर्षे जुना असल्याचे सिद्ध झाले.
समुद्राच्या तळाशी होती ‘मायक्रोबियल मॅट’
वैज्ञानिकांच्या मते, अब्जावधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचा मोठा भाग पाण्याखाली होता, तेव्हा सूक्ष्म जीवांचे गट पाण्याच्या किंवा समुद्राच्या तळाशी खडकांवर एक पातळ थर तयार करून राहायचे. याला विज्ञानाच्या भाषेत ‘मायक्रोबियल मॅट’ म्हटले जाते. काळाच्या ओघात हे सूक्ष्म जीव मृत झाल्यानंतर त्यांचे अवशेष खडकांमध्ये काळ्या रंगाच्या थरांच्या रूपात गाडले गेले.
जैविक पुराव्यांची झाली पुष्टी
हा कार्बन कोणत्याही निर्जीव रासायनिक प्रक्रियेतून नव्हे, तर सजीवांपासून तयार झाला आहे. हे सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिकांनी अत्याधुनिक स्पेक्ट्रोस्कोपी आणि आइसोटोप विश्लेषणाचा वापर केला. या तपासणीत कार्बनची रचना ‘केरोजेन’ नावाच्या पदार्थाशी हुबेहूब जुळली. (India Science Research) केरोजेनची निर्मिती केवळ जैविक पदार्थांच्या विघटन म्हणजेच सजीवांच्या अवशेषांमुळेच होऊ शकते. यामुळे 350 कोटी वर्षांपूर्वी झारखंडच्या या मातीत जीवनाची पहिली स्पंदने अस्तित्वात होती, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.