भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत ७.८ टक्क्यांचा विकासदर नोंदवत दमदार कामगिरी केली आहे.
भारताचा GDP 7.8 टक्क्यांवर; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना स्वदेशीचा आग्रह
भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत ७.८ टक्क्यांचा विकासदर नोंदवत दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले असून, आर्थिक प्रगतीचा हा वेग कायम ठेवण्यासाठी स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताच्या धोरणांना अधिक बळ देण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचा, विदेशात जाऊन लग्नसोहळे न करण्याचा तसेच आवश्यकता नसल्यास सोन्याची खरेदी टाळण्याचा सल्ला दिला. देशांतर्गत वस्तू आणि सेवांचा अधिकाधिक वापर केल्यास आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले.
७.८ टक्के GDP वाढ ही देशातील जनतेच्या पुरुषार्थ, संकल्पशक्ती आणि सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब असल्याचे मोदी यांनी म्हटले. जगभरात युद्धजन्य परिस्थिती, विविध संकटे आणि पुरवठा साखळीतील अडथळे कायम आहेत. कोरोनानंतरही जागतिक पातळीवर स्थिरता निर्माण झालेली नाही. अशा आव्हानात्मक वातावरणात भारताने वेगाने आर्थिक प्रगती केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशात निराशेचे वातावरण निर्माण करण्याचा आणि 'झुठ की गुंज'च्या माध्यमातून अपप्रचार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. मात्र, या सर्व परिस्थितीवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने ७.८ टक्क्यांचा विकासदर गाठल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी यांनी पुढे सांगितले की, भारताचा आर्थिक विकासाचा वेग असाच कायम ठेवायचा असेल तर स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारत या दोन्ही संकल्पनांचा आग्रहाने स्वीकार करणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवून आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन दिल्यास २०४७ पर्यंत अधिक सक्षम आणि विकसित भारताची निर्मिती करता येईल, असे त्यांनी म्हटले.
देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता ठेवू नये. आपली नीती आणि नियत स्पष्ट असून १४० कोटी भारतीयांची सामूहिक शक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ७.८ टक्के विकासदराचा आनंद साजरा करण्यासोबतच भविष्यासाठी नवा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी देशवासियांना केले.
भारताचा GDP ७.८ टक्क्यांवर
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने निर्माण झाली होती. मात्र, या परिस्थितीतही एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली. या कालावधीत देशाचा ढोबळ राष्ट्रीय उत्पादन अर्थात GDP वृद्धीदर ७.८ टक्के नोंदवला गेला आहे.