विषारी घटक असलेला लाडू खाल्ल्यामुळे चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.
हैदराबाद (Hyderabad Child Death) : विषारी घटक असलेला लाडू खाल्ल्यामुळे चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर परिसरात दुःखद वातावरण पसरले असून, कुटुंबीयांवर शोककळा दाटून आली आहे. लाडू खाल्ल्यानंतर काही क्षणांतच मुलाची तब्येत खालावू लागली आणि उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. ही घटना तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे.
गोविंदरावुपेट येथील एनटीआर कॉलनीत श्रवण यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत. घरासमोर खेळत असताना चार वर्षांचा अश्विनी नंदन याच्या नजरेस गोड पदार्थासारखी वस्तू पडली. तो ती उचलून घरात घेऊन गेला. प्रत्यक्षात तो पदार्थ माकडांना ठार करण्यासाठी विषारी द्रव्य मिसळून तयार करण्यात आला होता आणि त्यासाठीच तो बाहेर ठेवण्यात आला होता.
खेळताना अश्विनी नंदनने त्या पदार्थाचा काही भाग खाल्ला. त्याच्यासोबत असलेल्या इतर मुलांना त्या वस्तूबद्दल संशय आला आणि त्यांनी तो लगेच दूर फेकून दिला. मात्र, तोपर्यंत मुलाने तो खाल्ल्याने त्याची प्रकृती झपाट्याने बिघडली. परिस्थिती गंभीर होताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु ते अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचे सावट पसरले असून, एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. परिसरातही हळहळ व्यक्त होत असून वातावरण शोकमय झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माकडांचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी विषारी पदार्थ मिसळून लाडू तयार करून परिसरात ठेवण्यात आले होते, असा आरोप करण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपाय अत्यंत निष्काळजी आणि धोकादायक असल्याचे सांगत, यामुळे एका निष्पाप बालकाचा बळी गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक तसेच प्राणीप्रेमी यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी किंवा मारण्यासाठी अशा जीवघेण्या पद्धतींचा अवलंब करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास हाती घेतला असून, विषारी लाडू नेमका कोणी ठेवला याचा शोध सुरू आहे.