पती-पत्नीसह तीन चिमुकल्यांचा मृत्यू; घरातून बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय, फॉरेन्सिक पथकाकडून अन्नाचे नमुने संकलित
ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. रात्रीच्या जेवणात नूडल्स खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
सकाळी घरातून हालचाल दिसली नाही; शेजाऱ्यांना संशय
ही घटना रबूपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला श्री पदम गावात घडली. शनिवारी सकाळी बराच वेळ उलटूनही घरातील कोणीही बाहेर आले नाही किंवा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला.
शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा ठोठावून आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता कुटुंबातील पाचही जण बिछान्यावर निश्चल अवस्थेत पडलेले दिसले. यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
Noida में हृदयविदारक घटना जिसमें पूरा परिवार खत्म हुआ, शुरुआती जानकारी में food poison बताई जा रही है वजह!|| रात 10 बजे सोया परिवार फिर उठा नहीं। #greaternoida #ग्रेटरनोएडा #noida @noidapolice https://t.co/aOkTpCO1cz
— Hemant Kewaliya (ब्रजवासी) (@hemantbrajwasi) October 17, 2026
दरवाजा तोडून पोलिसांचा प्रवेश; पाचही जणांचा मृत्यू
माहिती मिळताच रबूपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता पाचही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतांची नावे महेश (वय ३७), त्यांची पत्नी ललिता (वय ३५), मुलगा लड्डू (वय ११), मुलगी मिष्टी (वय ७) आणि साक्षात (वय ३) अशी आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने नगला श्री पदम गावात शोककळा पसरली आहे.
नूडल्ससह खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी
प्राथमिक माहितीनुसार, महेश यांच्या आईसह शेजाऱ्यांनी कुटुंबाने आदल्या रात्री नूडल्स खाल्ल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस पथक, वैद्यकीय कर्मचारी आणि अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने स्वयंपाकघरातील चहाची भांडी, नूडल्स आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तपासणी अहवालातून अन्नामध्ये विषारी घटक होते का, हे स्पष्ट होण्यास मदत होईल.
विषबाधा, आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून सर्व शक्यतांची तपासणी
या प्रकरणात पोलिसांनी मृत्यूमागील विविध शक्यतांचा तपास सुरू केला आहे. अन्नातून विषबाधा झाली का, ही आत्महत्येची घटना आहे का किंवा कुटुंबासोबत घातपात झाला आहे का, याची पडताळणी केली जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल, अन्नपदार्थांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेतील तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण निश्चित केले जाणार आहे.
संपूर्ण कुटुंबाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. तपासातून कोणती माहिती समोर येते आणि मृत्यूमागील कारण काय होते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.