केंद्रीय परवाना असलेल्या अन्न व्यवसायांच्या तपासणीसाठी FSSAI ची पूर्वपरवानगी घेण्याच्या नियमावर आक्षेप; २६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी.
पुणे : अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीवरून महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्यातील वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्यातील अन्न व्यवसायांची तपासणी करण्याच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि FSSAI च्या नियमांना आव्हान दिले आहे. अन्न सुरक्षा व्यवस्थेत केंद्राकडून समांतर यंत्रणा उभारली जात असून, त्यामुळे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
FDA चा नेमका आक्षेप काय?
महाराष्ट्राच्या अन्न सुरक्षा आयुक्तांमार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ चा मूळ हेतू अन्न सुरक्षेच्या नियमनाची जबाबदारी विकेंद्रित पद्धतीने पार पाडणे हा होता. यापूर्वी राज्यातील अन्न सुरक्षा आयुक्त आणि नियुक्त अधिकारी या कायद्याची अंमलबजावणी करत होते.
मात्र, केंद्र सरकार आणि FSSAI यांनी कालांतराने कायद्यात केलेल्या विविध सुधारणा आणि नियमांमुळे राज्याच्या अधिकारांवर मर्यादा येत असल्याचा दावा FDA ने केला आहे. विकेंद्रित अंमलबजावणीची व्यवस्था हळूहळू कमकुवत केली जात असून, राज्याच्या तपासणी अधिकारांवर गदा येत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
FSSAI ने अधिकाराबाहेर जाऊन पदे निर्माण केल्याचा आरोप
FSSAI च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) ‘केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी’ (Central Food Safety Officer) आणि ‘केंद्रीय परवाना प्राधिकरण’ (Central Licensing Authority) यांसारखी पदे निर्माण केली. ही पदे निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेले अधिकार कायद्याच्या वैधानिक चौकटीशी सुसंगत नसल्याचा आक्षेप FDA ने घेतला आहे.
या माध्यमातून स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यात आली असून, ती घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित सुधारणा आणि नियम रद्द करण्याची मागणी राज्य सरकारने न्यायालयाकडे केली आहे.
मोठ्या हॉटेल्सच्या तपासणीसाठीही पूर्वपरवानगीची अट
सध्या वार्षिक ५० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेले अन्न व्यवसाय FSSAI च्या केंद्रीय परवाना प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे अशा मोठ्या व्यवसायांची किंवा तीन तारांकित हॉटेल्सची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र FDA ला FSSAI ची लेखी पूर्वपरवानगी घ्यावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य सरकारला आवश्यक वाटेल त्या वेळी अन्न व्यवसाय चालकांची (Food Business Operators) तपासणी करण्याचा अधिकार पुन्हा मिळावा, यासाठी FDA प्रयत्नशील आहे. केंद्राकडून परवाना मिळालेल्या आस्थापनांची तपासणी करण्यापासून राज्यातील अधिकाऱ्यांना रोखणाऱ्या मे २०२३ मधील आदेशालाही स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
२६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आता या याचिकेवर पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
केंद्र सरकार आणि FSSAI च्या नियमांना न्यायालयात आव्हान देऊन राज्यातील अन्न सुरक्षा यंत्रणेचे तपासणी अधिकार कायम ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे अन्न व्यवसाय क्षेत्राचे आणि राज्याच्या अंमलबजावणी यंत्रणेचे लक्ष लागले आहे.