भाजप आयटी सेलचे सदस्य विकास पांडे यांची फौजदारी मानहानीची तक्रार; २०१८ मधील ‘BJP IT Cell Part-2’ व्हिडीओवरून सुरू आहे कायदेशीर लढाई.
यूट्यूबर ध्रुव राठी याच्याविरोधातील फौजदारी मानहानी प्रकरणाने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीतील साकेत न्यायालयाने जारी केलेले समन्स गुरुग्राममधील त्याच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चिटकवण्यात आले आहे. हे प्रकरण भाजपच्या आयटी सेलशी संबंधित विकास सांस्कृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित असून, आता १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
ध्रुव राठीचे घर गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये आहे. न्यायालयाने तक्रारदाराला कोर्टाच्या कर्मचाऱ्यासोबत जाऊन समन्स बजावण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, ध्रुव राठीला प्रत्यक्ष समन्स देण्याऐवजी त्याच्या घराच्या मुख्य गेटवर नोटीस चिटकवून न्यायालयाचा आदेश पोहोचवण्यात आला.
२०१८ मधील व्हिडीओवरून मानहानीचा खटला
या संपूर्ण प्रकरणाचा संबंध २०१८ मध्ये अपलोड करण्यात आलेल्या ‘BJP IT Cell Part-2’ या व्हिडीओशी आहे. या व्हिडीओमध्ये भाजपच्या आयटी सेलसह आपल्याविरोधातही निराधार आरोप करण्यात आल्याचा दावा विकास पांडे यांनी केला आहे.
व्हिडीओमध्ये महावीर प्रसाद नावाच्या व्यक्तीला लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच ध्रुव राठीची बदनामी करण्यासाठी ५० लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, विकास पांडे यांनी हे आरोप फेटाळले होते. या आरोपांमुळे आपली वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आल्याचे सांगत त्यांनी फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली.
समन्स बजावण्यात विलंब का झाला?
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जुलै २०१९ मध्ये या प्रकरणात पहिल्यांदा समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर बराच काळ ते बजावले गेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ध्रुव राठी ऑस्ट्रेलियात राहत असल्याचे कारण त्यावेळी सांगितले जात होते. तसेच, समन्स स्वीकारले जात नसल्याचेही तक्रारदाराचे म्हणणे आहे.
आता ध्रुव राठी भारतात परतला असून, तो दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) असल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाकडून समन्स बजावण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुग्राममधील त्याच्या निवासस्थानी समन्स चिटकवण्यात आले.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होणार?
दरम्यान, दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात ध्रुव राठी सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अशा पार्श्वभूमीवर त्याच्या घरावर समन्स चिटकवण्यात आल्याने या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. १७ ऑक्टोबर रोजी साकेत न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय घडते आणि या फौजदारी मानहानी प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.